चंद्रपूर आणि बल्लारपुरात भूमिगत विद्युत केबल टाका
By Admin | Updated: October 15, 2015 01:20 IST2015-10-15T01:20:09+5:302015-10-15T01:20:09+5:30
चंद्रपूर आणि बल्लारपूर या शहरांमध्ये भूमिगत विद्युत केबल व्यवस्था स्थापित करण्याची मागणी वित्तमंत्री .

चंद्रपूर आणि बल्लारपुरात भूमिगत विद्युत केबल टाका
सुधीर मुनगंटीवार यांची मागणी : तातडीने कार्यवाही करण्याचे ऊर्जामंत्र्यांचे निर्देश
चंद्रपूर : चंद्रपूर आणि बल्लारपूर या शहरांमध्ये भूमिगत विद्युत केबल व्यवस्था स्थापित करण्याची मागणी वित्तमंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या दोन्ही शहरांमध्ये भूमिगत विद्युत केबल व्यवस्था स्थापित करण्याच्या दृष्टीने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.
१२ आॅक्टोबर रोजी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत ना.सुधीर मुनगंटीवार यांनी वरील मागणी केली. चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रात तसेच बल्लारपूर शहरात सातत्याने वीज पुरवठा खंडीत होण्याच्या समस्येला नागरिकांना सामोरे जावे लागते. चंद्रपूर आणि बल्लारपूर ही दोन्ही शहरे औद्योगिक दृष्टया महत्वपूर्ण आहेत. या शहरांमध्ये भूमिगत विद्युत केबल व्यवस्था स्थापित केल्यास या समस्येवर प्रभावी उपाययोजना होईल, असे मुनगंटीवार म्हणाले. या दोन्ही शहरांमध्ये भूमिगत केबल व्यवस्था स्थापित करण्यात येईल, असे सांगत ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी तीन महिन्यात विशेष अभियान राबवून अंदाजपत्रक व आराखडे सादर करण्यांचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. (स्थानिक प्रतिनिधी)
ऊर्जानगर वसाहतीचे नूतनीकरण करा
चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या ऊर्जानगर येथील वसाहतीतील इमारतींचे नूतनीकरण करावे. तसेच वसाहतीत आवश्यक सोईसुविधा उपलब्ध कराव्या, अशी मागणी वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात येत्या तीन महिन्यात १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता यांना दिले. सोमवारी चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतलेल्या आढावा बैठकीत सुधीर मुनगंटीवार यांनी वरील मागणी केली. आशिया खंडातील वीज निर्मितीच्या क्षेत्रातील महत्त्वपूर्ण असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राची ऊर्जानगर येथील वसाहत फार जुनी वसाहत आहे. या वसाहतीतील इमारतींचे नूतनीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. वसाहतीतील रस्त्यांची दुरुस्ती, व्यायामशाळेची निर्मिती, उद्यानाची निर्मिती, क्रीडा संकुलाची निर्मिती, उत्तम बाजारपेठेची निर्मिती आदी सोयीसुविधा निर्माण करणे आवश्यक आहे. या दृष्टीने तीन वर्षांचा कालबध्द कार्यक्रम आखावा व त्यासाठी खासगी आर्किटेक्ट नेमून याबाबतचा विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी याबाबत त्वरित१०० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्य अभियंता बुरडे यांना दिले.