आरोग्य विभागातील कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू
By Admin | Updated: July 11, 2015 01:41 IST2015-07-11T01:41:18+5:302015-07-11T01:41:18+5:30
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै २०१५ रोजी हा निर्णय घेतला आहे.

आरोग्य विभागातील कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू
घनश्याम नवघडे नागभीड
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कंत्राटी पदांना सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने ८ जुलै २०१५ रोजी हा निर्णय घेतला आहे.
केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यामध्ये केंद्रपुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यान्वित आहे. या अभियानामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान, आणि राष्ट्रीय रोगनियंत्रक प्रतिबंधक कार्यक्रम या योजनांचा समावेश आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानास केंद्र शासनाने सन २०१२-२०१७ या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी या विभागाच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य आरोग्य सोसायटीची स्थापना करण्यात आली असून सदर सोसायटीच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार मुक्त व्यवस्थेमार्फत जाहिरात देऊन शैक्षणिक अर्हता, अनुभव व वय आदी पात्रता तपासून विविध स्वरूपाच्या कंत्राटी नियुक्त्या मर्यादित कालावधीसाठी केल्या जातात. सदर कंत्राटी तत्वावरील पदांचा सामाजिक आरक्षण लागू करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.
सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार महाराष्ट्र अनु. जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग आणि इतर मागास प्रवर्ग आरक्षण अधिनियम २००१ हा ४५ दिवसांपेक्षा अधिक कालावधीकरिता देण्यात येणाऱ्या व आलेल्या सर्व कंत्राटी नियुक्त्यांना लागू असल्यामुळे राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत देण्यात येणाऱ्या सर्व कंत्राटी तत्वावरील नियुक्तीसाठी सामाजिक आरक्षण लागू करण्यात आले आहे.