वाघाच्या शोधासाठी हत्ती दाखल
By Admin | Updated: October 25, 2016 00:38 IST2016-10-25T00:38:47+5:302016-10-25T00:38:47+5:30
उत्तर वनपरिक्षेत्रात वाघाने मानवासहीत अनेक पाळीव प्राण्याचे बळी घेतले होते.

वाघाच्या शोधासाठी हत्ती दाखल
ब्रह्मपुरी वनविभाग : मुरपार येथे एक महिन्यांपासून सर्च चमू
ब्रह्मपुरी : उत्तर वनपरिक्षेत्रात वाघाने मानवासहीत अनेक पाळीव प्राण्याचे बळी घेतले होते. त्याची दहशत परिसरात कायम आहे. त्यामुळे त्याला जेरबंद करण्यासाठी ताडोबा येथून ब्रह्मपुरी वनविभागातील मुरपार वनक्षेत्रात दोन हत्ती दाखल झाले असून त्याद्वारे सर्च आॅपरेशन राबविण्यात येणार आहे.
ब्रह्मपुरी वनविभागाच्या परीक्षेत्रात मुरपार उत्तर वनपरिसरात वाघाने गेल्या एक- दीड महिन्यापासून धुमाकूळ घातला आहे. यातच सायगाव येथील गुरनुले नामक महिला शेतात काम करीत असताना वाघाने झडप घालून त्यांना ठार केले. त्यामुळे गावातील व परिसरातील ग्रामस्थांची वाघाला पकडण्याची मागणी केली होती.
नागरिकांचा वाढता दबाब लक्षात घेता वनविभागाने सर्च आॅपरेशनकरिता वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा ताफा गेल्या महिन्याभरापासून मुरपार परिसरात डेरे दाखल केला होता. परंतु वाघ वनविभागाच्या हातात लागला नाही. त्यामुळे वनविभागावर प्रचंड दबाव होता. या दबावाने सर्व प्रयोग अवलंबूनही निरर्थक ठरल्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्पातून दोन हत्तीची मागणी करण्यात आली.
दरम्यान हत्तीची मागणी करूनही मिळत नसल्याने पुन्हा वनविभाग वाघाला पकडण्यासाठी अडचणीत होता. परंतु लोकांचा वाढता दबाव पाहता सोमवारी दोन हत्ती मुरपारकडे रवाना होत असल्याची माहिती वनविभागाकडून प्राप्त झाली आहे. या हत्तीच्या माध्यमातून आता वाघाची शोध मोहिम राबविण्यात येत असल्याने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी काही अंशी सुटकेचा निश्व:स सोडला आहे. हत्तीच्या सर्च आॅपरेशनद्वारे वाघ पकडल्या जाण्यात यश येणार किंवा नाही, हे कळणारच असून ग्रामस्थांमध्ये भिती मात्र आजही कायम आहे. (तालुका प्रतिनिधी)