नांदा गावात डेंग्यूचा दुसरा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:20 IST2021-07-21T04:20:17+5:302021-07-21T04:20:17+5:30
आवाळपूर : मागील महिन्याभरापासून नांदाफाटा परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. यात दोन जणांचा नाहक बळी गेला. यापूर्वी ...

नांदा गावात डेंग्यूचा दुसरा बळी
आवाळपूर : मागील महिन्याभरापासून नांदाफाटा परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. यात दोन जणांचा नाहक बळी गेला. यापूर्वी एका २१ वर्षीय तरुणाचा डेंग्यूने मृत्यू झाल्यानंतर, आता हर्षाली सुनील वाटेकर रा.नांदा या नऊ महिन्यांच्या बालिकेचाही मृत्यू झाला आहे. अनेक जण रुग्णालयात भरती होऊन उपचार घेत असल्याची माहिती आहे, तर काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे बोलले जात आहे.
नांदाफाटा परिसरात स्वच्छतेचे तीनतेरा वाजले आहे. डेंग्यूच्या साथीवर उपायोजना करण्याऐवजी आरोग्य विभाग कुंभकर्णी झोपेत असल्याने, लोकप्रतिनिधींनी आता तरी त्यांना जागे करण्याची गरज आहे.
नांदा गावात मागील महिनाभरापासून डेंग्यूची साथ असून, दररोज १५-२० रुग्ण डेंग्यूने पॉझिटिव्ह येत आहेत. नागरिकच काय येथील डाॅक्टरांनाही डेंग्यूची लागण झाली आहे. स्थानिक जिल्हा परिषद सदस्य शिवचंद्र काळे यांनी आरोग्य विभागाला नांदाफाटा येथे आरोग्य तपासणी शिबिर लावून डेंग्यू तापावर नियंत्रण मिळविण्याकरिता उपाययोजना करण्याची मागणी केली आहे, परंतु आरोग्य विभागाने अद्याप कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. नांदाफाटा परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले असून, ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. यामुळे डासांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला आहे.