एकाच्या नियुक्तीमुळे दुसरा अतिरिक्त

By Admin | Updated: August 27, 2015 01:23 IST2015-08-27T01:23:36+5:302015-08-27T01:23:36+5:30

शाळेत रिक्त पद उपलब्ध नसताना संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी अंतर्गत बदल्या करून शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली.

Another addition to the appointment of one | एकाच्या नियुक्तीमुळे दुसरा अतिरिक्त

एकाच्या नियुक्तीमुळे दुसरा अतिरिक्त

अंतर्गत बदलीचा फटका : पद रिक्त नसतानाही शिक्षकाची नियुक्ती
चंद्रपूर : शाळेत रिक्त पद उपलब्ध नसताना संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी अंतर्गत बदल्या करून शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्ती केली. त्यानंतर कार्यरत सेवाज्येष्ठता शिक्षकांना अतिरिक्त ठरवून त्यांची दुसरीकडे बदली केली. हा प्रकार सावलीसह जिल्ह्यातील अन्य तालुक्यात घडला आहे. याचा फटका अनेक शिक्षकांना बसला असल्याने ही प्रक्रिया रद्द करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हा सरचिटणीस जे.डी. पोटे यांनी केली आहे.
१८ एप्रिल २०१३ च्या शासन निर्णयानुसार सावली येथील संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी रिक्त पद नसताना पंचायत समिती सभापतींच्या शिफारशीनुसार फेब्रुुवारी २०१४ मध्ये काही शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यामुळे अनेक शाळांतील कार्यरत शिक्षकांना २०१४ मध्ये अतिरिक्त ठरवून त्यांची दुसरीकडे नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे शिक्षकांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. हा प्रकार शिक्षकांवर अन्याय करणारा असल्याचे पोटे यांचे म्हणणे आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त करता येणार नसल्याचा निर्णय दिला आहे. मात्र, संवर्ग विकास अधिकाऱ्यांनी बदली करून अनेक कार्यरत शिक्षकांना अतिरिक्त ठरविले आहे. हा प्रकार चुकीचा असल्याने ही प्रक्रिया रद्द करावी, यासाठी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांना लवकरच निवेदन सादर करणार असल्याचेही पोटे यांनी सांगीतले. (प्रतिनिधी)

Web Title: Another addition to the appointment of one