शासनाची तूर खरेदीची घोषणा हवेत विरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 00:50 IST2017-05-15T00:50:33+5:302017-05-15T00:50:33+5:30
काही दिवस शासनाने हमी भाव देऊन तूर खरेदी केली व बंद करून दिली. त्यानंतर ३१ मेपर्यंत तूर खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची घोषणा केल्याने ...

शासनाची तूर खरेदीची घोषणा हवेत विरणार
भाव गडगडले : हजारो क्विंटल तूर शेतकऱ्याकडे शिल्लक, शेतकरी चिंतातूर
प्रविण खिरटकर । लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : काही दिवस शासनाने हमी भाव देऊन तूर खरेदी केली व बंद करून दिली. त्यानंतर ३१ मेपर्यंत तूर खरेदी शासन हमीभावाने करणार असल्याची घोषणा केल्याने शेतकऱ्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. परंतु या घोषणेला पाच दिवसांचा कालावधी लोटूनही शासनाने तूर खरेदीबाबत बाजार समित्यांना लेखी अद्यापही कळविले नाही. त्यामुळे शासनाची तूर खरेदीची घोषणा हवेत विरणार तर नाही ना, अशी चर्चा तूर उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आहे.
यावर्षी तुरीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले. शेतकऱ्यांनी तूर बाजारात आणल्यावर खुल्या बाजारात तुरीचे भाव गडगडले. त्यामुळे तुर उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. शासनाने तुरीकरिता पाच हजार ५० रूपये हमीभाव जाहीर केला. परंतु कित्येक दिवस शासनाने तुर हमीभावाने खरेदी करणारे केंद्र सुरू केले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली गरज भागविण्यासाठी हमीभावापेक्षा कमी दराने तुरी विकल्या. त्यानंतर शासनाने अनेक केंद्र हमीभावाने तुर खरेदीसाठी सुरू केले. हमीभाव पाच हजार पाचशे रूपये प्रति क्विंटल मिळत असल्याने शासनाच्या तुर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. तुरीच्या वजनाकरिता कित्येक दिवस शेतकऱ्यांना ताटकळत राहावे लागले. तरीही शेतकऱ्यांनी यातना सहन केल्या. मात्र शासनाने तुर खरेदी बंद केली. परंतु आजही हजारो क्विंटल तुर शेतकऱ्यांच्या घरात पडुन आहे. त्यामुळे शासनाने पाच दिवसांपुर्वी ३१ मेपर्यंत तुर शासन खरेदी करेल, अशी घोषणा केली. बाजार समित्यांकडून तत्काळ अहवाल मागून घेतला. परंतु एक एक दिवस घोषणेनंतर लोटत आहे व तुर खरेदीची ३१ मे ही तारीख जवळ येत आहे. परंतु शासनाने अद्यापही बाजार समित्यांना लेखी आदेश दिले नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढत आहे. दिवसा गणीक बाजार समिती कार्यालयात जावून तुर खरेदी केव्हा सुरू होणार, याची चौकशी शेतकरी करीत आहे. परंतु असे कोणतेही निर्देश आले नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.
सातबाऱ्यावर नमूद असणे आवश्यक
नाफे ड केंद्रावर तुर विक्रीसाठी आणत असताना पेरीव पत्र म्हणजेच सातबाऱ्यावर तूर पेरल्याचे नमुद असणे आवश्यक आहे. अन्यथा अशा तुर स्विकारल्या जाणार नाही. यामुळे तुर शिल्लक असलेले शेतकरी सातबारा पेरीव पत्र काढून सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे. या सक्तीमुळे शेती नसलेले परंतु तुर विक्री करण्याकरिता नाफे डमध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना लगाम बसणार असल्याचे मानले जात आहे.
तातडीने तूर खरेदी करावी
शेतकऱ्याकडे हजारो क्विंटल तुरी शिल्लक आहे. खुल्या बाजारात अत्यल्प दराने तूर विकावी लागत असल्याने शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. नव्याने येणाऱ्या शेतीच्या हंगामाकरिता शेतकऱ्यांना पैशाची गरज आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तूर नाफे डमार्फ त तातडीने खरेदी करणे सुरू करावे, यासाठी वरोरा कृषी उत्पन्न बाजार समितीने शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. त्यामूळे शासनाने तातडीने तूर खरेदी करून तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
विशाल बदखल , सभापती.
गोंधळ उडण्याची शक्यता
काही दिवस बंद असलेली नाफेड खरेदी सुरू करण्याची घोषणा शासनाने केली. याला पाच दिवसांचा कालावधी लोटत आहे. ज्यादिवशी तुर खरेदी केंद्र सुरू होईल, त्या दिवशी मोठ्या प्रमाणात आवक येईल. त्यामूळे गोंधळ उडण्याची शक्यता आहे.