धानाला उत्पादन खर्चानुसार हमी भाव घोषित करा
By Admin | Updated: March 27, 2015 00:54 IST2015-03-27T00:54:56+5:302015-03-27T00:54:56+5:30
आधीच सततची नापिकी, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नाही,

धानाला उत्पादन खर्चानुसार हमी भाव घोषित करा
सावली : आधीच सततची नापिकी, पूर्व विदर्भातील शेतकऱ्यांना धान पिकाशिवाय उपजिविकेचे अन्य साधन नाही, अवेळी अपुऱ्या व कमी पावसाने शेतरकरी त्रस्त आहे. त्यातच निर्यात बंदीमुळे शासनाचे हमी भाव देखील घसरले आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर असून देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या हवालदिल शेतकऱ्याला न्याय देण्याकरिता उत्पादन खर्चावर आधारीत हमीभाव शासनाने घोषित करावे, अशी मागणी खासदार अशोक नेते यांनी लोकसभेत केली.
महाराष्ट्र राज्याच्या पूर्व-विदर्भ भागात असलेल्या गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा तथा नागपूर जिल्ह्याच्या काही भागातील धान ुउत्पादकांच्या प्रश्नावर खा. अशोक नेते म्हणाले, या भागातील शेतकऱ्यांचे धानपिक हे मुख्य पीक आहे. गडचिरोली सारख्या अतिमागास जिल्ह्यात सिंचनाच्या सोयी नाहीत. मागील खरीपात विलंबाने व अपुऱ्या पावसामुळे पेरणीचे व धान पिकाचे अतोनात नुकसान झाले. मात्र शेतकऱ्यांच्या धानाला भाव कमी मिळत आहे.
भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, थायलंड हे धानाचे प्रमुख निर्यात देश आहेत. परंतु, आता या देशाच्या स्पर्धेत काही इतर देश सहभागी झाले असून कमी दराने भाताची निर्यात करीत आहेत. त्यातच इराण व इराक भाताची आयात करणाऱ्या देशानी मार्च अखेर पर्यंत आयात बंद केली आहे. त्यामुळे भारतातील भाताची निर्यात रखडलेली आहे. परिणामी धानाचे हमीभाव कमी झाले आहे.
व्यापाऱ्यांना कवडीमोल दराने धान विकावे लागत आहे. त्यामुळे गरीब शेतकरी लाचार व हवालदील झाला असून सामान्य व इतर शेतकऱ्यांचा माल योग्य दराच्या प्रतीक्षेत घरी अथवा गोडावूनमध्ये पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये शासनाप्रती प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्यासाठी धानाला उत्पादन खर्चावर हमी भाव शासनाने जाहीर करावा अशी सूचना लोकसभा अध्यक्षामार्फत खा. अशोक नेते यांनी केंद्र शासनाकडे केली आहे. त्यामुळे केंद्र शासन त्यांच्या सूचनेची दखल घेऊन हमी भाव जाहीर करेल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. (तालुका प्रतिनिधी)