पशु वैद्यकीय दवाखान्याची इमारत सदोष
By Admin | Updated: June 25, 2016 00:43 IST2016-06-25T00:43:53+5:302016-06-25T00:43:53+5:30
शासनाने लाखो रुपये खर्च करुन जनहितार्थ पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधली.

पशु वैद्यकीय दवाखान्याची इमारत सदोष
इमारत चुकीच्या जागेवर : हस्तांतरणास पशु खात्याचा नकार
विनेशचंद्र मांडवकर नंदोरी
शासनाने लाखो रुपये खर्च करुन जनहितार्थ पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत बांधली. मात्र कुठलाही सोई-सुविधा पुरविल्या नाही. इमारतही चुकीच्या जागेवर बांधण्यात आल्यामुळे अनेक अडचणी निर्माण होत आहे. सदर इमारत सदोष असल्याने इमारत बांधूनही तिथे दवाखाना सुरू होऊ शकला नाही.
जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत ही इमारत चार ते पाच वर्षापूर्वी बांधण्यात आली. ३ मार्च २०१४ रोजी ना. हंसराज अहीर यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पार पडला व इमारतीसमोर तसा फलकही लावला. मात्र पाणी, वीज, लसीकरणाचे कठडे, इतर आवश्यक सोई-सुविधा या ठिकाणी नाहीत. थोड्या पावसाने चिखल साचला जातो. परिसरात घाण पसरली असून बेशरमाची अनावश्यक झुडुपे वाढली आहेत.
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने पशुवैद्यकीय विभागास कामाचे खरे प्रारुप दिले नसल्याचे पशुवैद्यकीय अधिकारी पराते यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. जागेचा अंदाज न घेता खोलगट जागेवर इमारत बांधण्यात आली. इमारतीपर्यंत जाण्यायोग्य रस्ता तयार झालेला नाही. अपूर्ण असलेली व सुविधा नसलेली इमारत हस्तांतर करण्यास पशुखात्याने नकार दिला आहे. इमारत खोलगट भागात असल्याने सभोवताल पाणी साचलेले असते.
इमारतीच्या पायथ्याशी मोठे खड्डे पडले असल्याने दवाखान्याची व क्वॉर्टरची इमारत कोसळण्याची शक्यता आहे. इमारतीपर्यंत जाण्यायोग्य रस्ता व इतर सुविधा याकरिता १० लाखाच इस्टीमेट जिल्हा परिषद बांधकाम विभागास देण्यात आले.
पावसाळा तोंडावर आला पण रस्ता तयार झाला नाही व सुविधा पुरविण्यात आल्या नसल्याचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी देशपांडे यांनी भ्रमणध्वनीवरुन ‘लोकमत’ला सांगितले. या संदर्भात वरोरा पंचायत समितीचे उपअधीक्षक अभियंता धानकुटे यांच्याशी संपर्क साधला असता ते कामाचे प्रारुप दिल्याचे सांगतात.
बांधकाम विभाग व पशुवैद्यकीय विभाग यांच्या भांडणात नंदोरी परिसरातील पशुपालक मात्र त्रस्त झाले आहेत.
इमारत न वापरताच दुरुस्ती करावी लागणार
इमारत न वापरताच इमारतीची नव्याने दुरुस्ती करावी लागणार आहे. यात शासकीय तिजोरीवर नाहक भुर्दंड लादला जाणार आहे. प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे सामान्य जनता आपल्या हक्कांपासून वंचित राहिली आणि पैशाचाही अपव्यय झाला. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करुन पशु वैद्यकीय दवाखाना सुरु करावा, अशी नंदोरीवासीयांची मागणी आहे.