शेगावमध्ये जनावरांचा चारा घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2018 22:17 IST2018-04-15T22:17:04+5:302018-04-15T22:17:04+5:30
सगळीकडे घोटाळ्याची मालिका गाजत असताना आता जनावरांचा चाराही त्याला अपवाद नाही. कोंडवाड्यात जनावरे नसतानाही दोन लाख रूपयांचा चारा खरेदी करण्यात आला. हा प्रकार शेगावमध्ये घडला असून सर्वत्र या घोटाळ्याची चर्चा आहे.

शेगावमध्ये जनावरांचा चारा घोटाळा
लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : सगळीकडे घोटाळ्याची मालिका गाजत असताना आता जनावरांचा चाराही त्याला अपवाद नाही. कोंडवाड्यात जनावरे नसतानाही दोन लाख रूपयांचा चारा खरेदी करण्यात आला. हा प्रकार शेगावमध्ये घडला असून सर्वत्र या घोटाळ्याची चर्चा आहे.
वरोरा तालुक्यातील मोठी बाजारपेठ म्हणून शेगाव ओळखले जाते. शेगावला भद्रावती, वरोरा व चिमूर तालुक्यातील अनेक गावे जोडली असल्याने गावात नेहमी वर्दळ असते. शेगावमध्ये एक कोंडवाडा असून सदर कोंडवाड्यात पोलिसांनी गुन्ह्यामध्ये जप्त केलेली व अवैधरित्या वाहतुकीदरम्यान सापडलेली जनावरे पाठविली जाते. यासोबत मोकाट फिरणाऱ्या जनावरांनाही कोंडवाड्यात टाकले जाते. मागील चार महिन्यांपासून बोटावर मोजण्याइतकेच जनावरे कोंडवाड्यात होती. त्याकरिता जवळपास दोन लाख रूपयांचा चारा घेण्यात आल्याचे समजते. त्यामुळे जनावरे नसताना चारा गेला कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा नागरिक करताना दिसून येत आहे. आजपर्यंत नाली, रस्ते बांधकाम, शासकीय इमारती बांधकाम यामध्ये आर्थिक घोटाळे होत असल्याची अनेक उदाहरणे समोर आली. परंतु जनावरांच्या चाºयातही घोटाळा होत असल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मागील चार महिन्यात चारा खरेदी केला. चारा खरेदी जर एखाद्या पशुपालकाने केला तर असंख्य जनावरांना हा चारा वर्षभर होत असतो, असे मत शेतकरी व्यक्त करीत आहे.