नाराजीने बिघडले आघाडीचे गणित

By Admin | Updated: September 21, 2014 23:47 IST2014-09-21T23:47:32+5:302014-09-21T23:47:32+5:30

५७ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात २१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला आणि सात जागा असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस या मित्रपक्षाला (अर्थात भाराकाँ-राकाँ आघाडीला)

Anger has left the mathematics behind | नाराजीने बिघडले आघाडीचे गणित

नाराजीने बिघडले आघाडीचे गणित

गोपालकृष्ण मांडवकर - चंद्रपूर
५७ सदस्य संख्या असलेल्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात २१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला आणि सात जागा असलेल्या राष्ट्रवादी काँगे्रस या मित्रपक्षाला (अर्थात भाराकाँ-राकाँ आघाडीला) २८ अधिक एक २९ चा मेळ साधत सत्तेपर्यंत पोहचता मात्र आलेले नाही. जिल्हा परिषदेत हातातोंडाशी आलेली सत्तेची संधी निव्वळ अंतर्गत नाराजी आणि विसंवादाने गमावल्याची चुटपूट आता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अस्वस्थ करीत आहे.
गेल्या वेळच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाचा पदर पकडून उपाध्यक्षपद आणि एक सभापतिपद मिळवून सत्ताफळे चाखली. अख्ख्या राज्यभर या अभद्र मैत्रीची चर्चाही झाली होती. लोकसभा निवडणुकीनंतर ही मैत्री तोडण्याचे आदेशही आले होते. मात्र सत्तेचे गुळपिठ सुरूच राहीले.
ऐन पंधरवड्यावर आलेल्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जुनाच कित्ता गिरविणे शक्य नव्हते. मुंबईतूनही तसे फर्मान आल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांनी काँग्रेससोबत राहणे पसंत केले. मात्र एकत्र आलेल्या या दोन्ही पक्षांतील सदस्यांच्या नाराजीचा आणि अंतर्मनाचा विचार झाला नाही. परिणामत: वरपांगी २८ चा आकडा गाठूनही सत्तेची जुळवाजुळव करण्यात यश न आल्याने अखेर जिल्हा परिषदेवर भाजपाला सत्ता स्थापण्याचा मार्ग मोकळा झाला.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुका लागताच भाजपाच्या नेत्यांनी सावध भूमिका घेत सर्वांना गोळा केले. राष्ट्रवादीकडेही गळ टाकून पाहीला. सात पैकी चार जण गळाला लागलेही. मात्र मतदानाच्या दिवशी सकाळी तिघांना घरी परत आणण्यात राष्ट्रवादीला यश आले. पंकज पवार यांना मनविण्यात मात्र राष्ट्रवादीचे नेते अपयशी ठरले. परिणाम व्हायचा तोच झाला. एक मत डोळ्यादेखत दुसऱ्या पारड्यात पडले.
काँग्रेसच्या चित्रा डांगे यांनी मतदान प्रक्रियेत तटस्थ भूमिका घेतली. पण या तटस्थ भूमिकेमागे वेगळेच महाभारत आहे. अध्यक्षपदाचे गाजर दाखवून ऐनवेळी नेत्यांनी त्यांना सभागृहातच हुलकावणी दिली. शब्द देऊनही आपलेच नेते ऐनवेळी दगा देत असल्याचे पाहून त्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. सभागृहात त्यांना समजाविण्यात आले. नेत्यांनी नियोजनपूर्वक चित्रा डांगे यांना आधीच समजावले असते, तर कदाचित चित्रही वेगळे असते.
खरे तर, काँग्रेसचा अध्यक्षपदाचा उमेदवार ठरण्यावरून गेल्या १२ तासांपासून घोळ सुरू होता. उपाध्यक्षपदावरूनही असेच चर्चीतचर्वण सुरू होते. नावे ठरली तोपर्यंत वेळ मात्र पुढे सरकून गेली होती.
राष्ट्रवादीने आधीपासून ‘हातचे दोन’ दाखवा, अशी भूमिका काँग्रेसपुढे घेतली होती. मात्र काँग्रेसचे वरिष्ठ नेते विधानसभा निवडणुकीत गुंतल्याने वेळेपर्यंत काहीच साधले नाही. मोबाईलचे बिल वाढविण्यातच वेळ गेला.
शिवसेनेच्या सदस्यांनी दगा दिल्याचा आरोप जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या नेत्यांकडून होत आहे. सेनेचे दोन सदस्य ऐनवेळी फितूर झाल्याचाही आरोप आहे. पण भाजपाने साधलेली खेळी काँगे्रसच्या अंगलटास आली, हे मान्य करावेच लागणार आहे.
शिवसेनेचे सदस्य एकाच वेळी दोन्हीकडे संपर्क ठेवून होते. अशातच आमदार सुधीर मुनगंटीवारांनी राजकीय खेळी करून त्यांच्या हाती कमळ दिले. इकडे मात्र २८ अधिक दोन बरोबर तीस असे गणित करणाऱ्या नेत्यांच्या हाती मात्र भोपळा आला.

Web Title: Anger has left the mathematics behind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.