अंगणवाडी महिलांचा मेळावा
By Admin | Updated: August 2, 2015 01:13 IST2015-08-02T01:13:36+5:302015-08-02T01:13:36+5:30
कोट्यवधीची खरेदी कागदावरच करायची आणि हा सारा पैसा हडप करायचा, असा हा खेळ सत्ताधाऱ्यांनी सुरू केला असून पुढील निवडणुकीची पूर्वतयारी त्यांनी सुरू केली आहे.

अंगणवाडी महिलांचा मेळावा
सरकारला विचारणार जाब : मेळाव्यात विविध विषयांवर चर्चा
जिवती : कोट्यवधीची खरेदी कागदावरच करायची आणि हा सारा पैसा हडप करायचा, असा हा खेळ सत्ताधाऱ्यांनी सुरू केला असून पुढील निवडणुकीची पूर्वतयारी त्यांनी सुरू केली आहे. याच पैशातून निवडणुकीच्या काळात लोकांना टी शर्ट, छत्र्या, महिलांना बॅग, विविध समाजाकरिता भांड्याची खरेदी केली जाते, असे मत गजानन सवाईथुल यांनी व्यक्त केले. अंगणवाडी महिलांचा मेळावा बाबाराव मून यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी जिवती येथे पार पडला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते. प्रास्ताविक भाषणात लता झाडे म्हणाल्या, अंंगणवाडी महिलांचे वाढीव मानधन देण्याकरिता शासनाजवळ पैसा नाही. तर अनावश्यक वस्तु खरेदी करण्याकरिता पैसा कुठून येतो, असा सवाल त्यांनी केला. प्रा. दहिवडे म्हणाले, ११ कोटींची खोबरा चिक्की अजूनपर्यंत अंगणवाडी महिलांना डोळ्याने दिसली नाही. खोबरा चिक्की खरच खरेदी केली काय? काँग्रेसवाले तर दुधात पाणी टाकत होते. पण धुतल्या तांदळासारखे पांढरे स्वच्छ प्रशासन देण्याचा दावा करणारे भाजपा सरकार पाण्यातच दुध टाकत आहेत, हेच जनतेला पहावयास मिळत आहे. असेच जर होत राहिले तर येत्या काळात या देशातील जनता सरकारला बुरे दिन दाखविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास प्रा. दहिवडे यांनी व्यक्त केला. अंगणवाडी महिलांच्या प्रश्नांचा जाब अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना विचारण्याकरिता १५ आॅगस्टला चंद्रपूरला यावे, असे आवाहनही त्यांनी केले. मेळाव्यात उपस्थितांचे आभार सुशीला कर्णेवार यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)