अंगणवाडी महिलांचा मेळावा
By Admin | Updated: May 7, 2015 01:00 IST2015-05-07T01:00:50+5:302015-05-07T01:00:50+5:30
अंगणवाडी महिलांचा मेळावा कुंदा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदेवाही येथे घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते.

अंगणवाडी महिलांचा मेळावा
सिंदेवाही : अंगणवाडी महिलांचा मेळावा कुंदा वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली सिंदेवाही येथे घेण्यात आला. प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित होते.
प्रास्ताविक भाषणात वर्षा कोंडेकर म्हणाल्या, गेल्या चार महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना केंद्र शासनाचे तसेच राज्य शासनाचे मानधन मिळाले नाही. सेविकेने जगायचे तर कसे जगायचे असा भीषण प्रश्न पुढे उभा ठाकला आहे. जिल्हा परिषदेवर जाऊन असंतोष व्यक्त करायचा तर पैशाअभावी अंगणवाडी सेविका तेदेखील करु शकत नाही. ही वस्तुस्थिती असताना शासनाला वाटते की सर्वकाही व्यवस्थित चालले आहे. प्रा. रमेशचंद्र दहिवडे म्हणाले, गरीबांना जगण्याचा अधिकार नाही, असा दृष्टिकोन बाळगणाऱ्यांच्या हातात देशाची सत्ता आली आहे. अंगणवाडी महिलांना केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या वतीने मानधन दिले जाते. मात्र दोघांनीही चार महिन्यांपासून यातून अंग काढले आहे. अंगणवाडी महिलांना १ एप्रिल २०१४ पासून मानधन वाढ देण्याच्या उद्देशाने राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सह्याद्रीवर बैठक बोलाविली होती. सर्वच अंगणवाडी संघटनेच्या प्रतिनिधींनाही निमंत्रित केले होते.
मात्र बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे गैरहजर असल्याने निर्णय होऊ शकला नाही. त्यानंतर १५ एप्रिलला पुन्हा अर्थमंत्र्यांनी सह्याद्रीवर बैठक बोलाविली त्याही बैठकीला पंकजा मुंडेंनी याकडे लक्ष दिले नाही. महाराष्ट्र शासनाने याची गंभीरपणे दखल घ्यावी. राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविका तसेच मदतनिसांच्या जीवनाशी खेळणाऱ्या बालकल्याणमंत्री यांची पदावरुन हकालपट्टी करण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे राज्यध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली. अंजिरा कोलते यांच्या आभार प्रदर्शनाने मेळाव्याचा समारोप झाला. यावेळी लता जनबंधू, शालिनी धर्मपुरीवार, रुपाली हटकर, सविता मगरे उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)