अंगणवाडी सेविका भरपावसात रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 00:42 IST2019-08-14T00:42:36+5:302019-08-14T00:42:58+5:30
शालेयपूर्व शिक्षण व सकस आहार पुरविण्याचे कर्तव्य बजावूनही विविध मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले.

अंगणवाडी सेविका भरपावसात रस्त्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
ब्रम्हपुरी : शालेयपूर्व शिक्षण व सकस आहार पुरविण्याचे कर्तव्य बजावूनही विविध मागण्यांची शासनाने दखल घेतली नाही. त्यामुळे जिल्हा अंगणवाडी कर्मचारी सभा (महाराष्ट्र) च्या नेतृत्वात अंगणवाडी सेविकांनी मंगळवारी उपविभागीय कार्यालयासमोर भर पावसात आंदोलन केले.
अंगणवाडी सेविकांना थकीत मानधन द्यावे, प्रधानमंत्र्यांनी ११ सप्टेंबर २०१८ रोजी जाहीर केलेली मानधन वाढ लागू करावी, निवृत्त कर्मचाऱ्यांना मानधनाच्या अर्धे मानधन व एकरक्कमी सेवा निवृत्तीवेतन द्यावे, मोबाईल गहाळ अथवा तुटफुट झाल्यास दंड न ठोठावता शासनानेच विमा काढावा, अंगणवाडीसेविका व मदतनिसांची रिक्त पदे भरावी, मिनी अंगणवाडीला मदतनिस द्यावी, नगरपरिषद क्षेत्रात प्रभागाची अट न ठेवता सेवा ज्येष्ठतेनुसार मदतनिसांना नियुक्त करावे, आदी मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना देण्यात आले. मागण्या मान्य झाल्या नाही तर आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. यापूर्वी देखील संघटनेने आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले होते.
शिष्टमंडळात जिल्हा कार्याध्यक्ष इम्रान कुरेशी, विद्या वारजूरकर, मीना ठाकूर, रागिनी दोनाडकर, राकता वाघाडे, पौर्णिमा ठेंगरी, वर्षा गभणे, सविता चौधरी, विद्या गायधने, संघमित्रा रामटेके, सुनंदा बांगरे, प्रभा चामरकर आदी उपस्थित होते.