अंगणवाडी इमारतीला भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:30 IST2017-07-18T00:30:41+5:302017-07-18T00:30:41+5:30
आईच्या शाळेनंतर मुलांना अक्षरांची ओळख होते ती अंगणवाडीमध्ये. खरेतर शिक्षणाचा पाया भक्कम होतो, ...

अंगणवाडी इमारतीला भेगा
धोक्याची शक्यता : चिमुकल्यांचा जीव टांगणीला
आशीष घूमे। लोकमत न्यूज नेटवर्क
वरोरा : आईच्या शाळेनंतर मुलांना अक्षरांची ओळख होते ती अंगणवाडीमध्ये. खरेतर शिक्षणाचा पाया भक्कम होतो, तो याच ठिकाणी. मात्र वरोरा शहरापासून काही अंतरावर असणाऱ्या येन्सा या गावातील अंगणवाडीची परिस्थिती पहिल्यानंतर येथे शिक्षणाचा पायाच धोक्यात असल्याचे दिसत आहे. या अंगणवाडीच्या इमारतीला सर्वत्र भगदाड पडले असून ही इमारत धोकादायक असतानाही चिमूरडे जीव मुठीत घेऊन अक्षरे गिरवित आहेत.
एकीकडे शासनाकडून डिजीटल इंडियाचा उदोउदो होत असताना येन्सा या गावातील अंगणवाडीचे विद्यार्थी जीव मुठीत घेवून शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. एकूणच या अंगणवाडीची परिस्थिती पाहता कसा होणार इंडिया डिजीटल, असा प्रश्न येथील गावकऱ्यांच्या मनात उपस्थित होत आहे.
देशात सर्वत्र कान्व्हेंट संस्कृतीचा बोलबाला झाला आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातील पालकांचाही कल कान्व्हेंटकडे वळत आहे. अगदी नर्सरीपासूनच पालक आपल्या मुलांचा दाखला इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये करीत आहेत. कधीनव्हे ती अलिकडे ग्रामीण परिसरात अशी परिस्थिती दिसून येत आहे. मात्र गरीब पालकांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब शेतमजूर वर्ग आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या पाल्यानां अंगणवाडीत पाठवित आहेत. मात्र अंगणवाड्यांची इमारतच कोसळण्याच्या स्थितीत असल्याने आपल्या मुलांना घरीच ठेवणे बरे, असे आता पालक म्हणू लागले आहेत.
गेल्या पाच वषार्पासून या इमारतीला पाडून नवीन इमारत बांधण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मात्र ग्रामपचांयत प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करीत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.