अन् संपूर्ण मोहाळी नि:शब्द
By Admin | Updated: July 14, 2017 00:20 IST2017-07-14T00:20:43+5:302017-07-14T00:20:43+5:30
शुभम आणि नितीन या दोघांचा कोरंबीच्या डोहात बुडून मृत्यू झाला अशी बातमी घेऊन जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधी मोहाळी गावात पोहचले

अन् संपूर्ण मोहाळी नि:शब्द
घनश्याम नवघडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : शुभम आणि नितीन या दोघांचा कोरंबीच्या डोहात बुडून मृत्यू झाला अशी बातमी घेऊन जेव्हा प्रस्तुत प्रतिनिधी मोहाळी गावात पोहचले, तेव्हा त्यांच्या या बातमीवर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. पण अनेकांनी जेव्हा या बातमीची खात्री करून घेतली आणि ती सत्य असल्याचे निष्पन्न झाले, तेव्हा संपूर्ण गाव नि:शब्द झाला.
शुभम शामजी रामटेके (२६) आणि नितीन किसन कोलते (२५) हे एकाच गावातील आणि एकमेकांचे जीवलग मित्र. शुभम बि.एस्सी करीत होता तर नितीनने आयटीआयचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. दोघेही गावातील कोणत्याही वादविवादात न पडता आपण आणि आपले काम भले. या वृत्तीने लागणारे हुशार विद्यार्थी म्हणून दोघांचीही गावात ओळख आणि उल्लेखनीय बाब अशी की दोघेही आपला बहुतांश वेळ एकत्रच घालवत.
गुरुवारीही ते असेच एकत्र बसले होते. बरीच चर्चा केल्यानंतर गावात रिकामे बसून काय करायचे म्हणून सहज कोरंबी येथील डोहाकडे सहज फिरायला निघाले. नागभीड परिसरातील अनेक तरुण या ठिकाणी वेळ घालविण्यासाठी येत असतात. तसेच तेसुद्धा आले. पण त्यांना काय माहीत काळ आपली वाट पाहत आहे. या ठिकाणी आल्यानंतर स्वच्छ आणि खळखळणाऱ्या त्या डोहातील पाण्याचा त्यांना मोह आवरता आला नाही आणि येथेच त्यांचा घात झाला. ते खोल पाण्यात बुडाले.
सोबत असलेल्या त्यांच्या एका मित्राने जवळ असलेल्या कोरंबीत जाऊन ही माहिती दिली. पण खुपच वेळ झाला होता. तोपर्यंत मोहाळी येथेही ही खबर देण्यात आली. पण यावर कोणाचाच विश्वास बसत नव्हता. अरे आत्ताच तर मी त्यांना येथेच बसले असताना पाहिले. काहीही सांगू नकोस, असा उलट प्रश्न विचारून त्या सत्य बातमीवर अनेकजण अविश्वास व्यक्त करीत होते. पण हे सत्य आहे. खरेच शुभम आणि नितीनचा कोरंबीच्या डोहात मृत्यू झाला याची खात्री पटली, तेव्हा ते नि:शब्द तर होत होतेच. पण कोरंबीच्या डोहाकडे धावही घेत होते.