आनंदवन हा शून्यातून निर्मिलेला सामूहिक आविष्कार - विकास आमटे

By Admin | Updated: September 6, 2015 00:48 IST2015-09-06T00:48:44+5:302015-09-06T00:48:44+5:30

बाबा आमटे एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी करून ठेवलेले कार्य अफाट आहे. वंचितांच्या वेदनांवर फुंकर घालत त्यांनी जगण्याची नवी दृष्टी दिली, ....

Anandvan is a collective invention created from zero - Vikas Amte | आनंदवन हा शून्यातून निर्मिलेला सामूहिक आविष्कार - विकास आमटे

आनंदवन हा शून्यातून निर्मिलेला सामूहिक आविष्कार - विकास आमटे


चंद्रपूर : बाबा आमटे एक लोकोत्तर व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी करून ठेवलेले कार्य अफाट आहे. वंचितांच्या वेदनांवर फुंकर घालत त्यांनी जगण्याची नवी दृष्टी दिली, असे प्रतिपादन डॉ.विकास आमटे यांनी केले. सृजनच्या मंचावरुन ‘आनंदवन प्रयोगवन’ या पुस्तकाचे लोकार्पण करताना ते बोलत होते. या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांनी केले होते.
भुकेलेल्यांच्या पोटाला अन्न देणे हे अध्यात्मच आहे, असे स्पष्ट करीत असतानाच बाबा आमटे खऱ्या अर्थाने कळायला अजून ५०० वर्षे लागतील, असेही ते म्हणाले. आनंदवनाशी डॉ.श्रीराम लागू, नाना पाटेकर असे कितीतरी मान्यवर जुळले असल्याचे सांगत नाना पाटेकर कुणाला भेट देत असताना आवर्जुन आनंदवन निर्मित वस्तू व पुस्तकेच भेट देत असतात, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. आनंदवन हे शुन्यातून निर्माण झालेले सामूहिक आविष्काराचे एक अभिनव मॉडेल असल्याचेही त्यांनी यावेळी अधोरेखित केले. यावेळी ताई, बाबांच्या अनेक आठवणीही त्यांनी सांगितल्या व त्या दोघांनी घेतलेल्या क्रांतिकारी निर्णयाची व प्रयोगाचीही त्यांनी माहिती दिली. श्वेता चावरे यांच्या संचालनाखाली पार पडलेल्या या लोकार्पण सोहळ्याला शल्यचिकित्सक, साहित्यिक आणि आनंदवनाचे स्नेही डॉ.शरदचंद्र सालफळे आणि डॉ.विकास आमटे यांचे पुत्र कौस्तुभ आमटे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राधा कासलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरानंदवनच्या कलाकारांनी स्वागत गीत सादर केले. त्यानंतर ‘आनंदवन समाजभान’ या उपक्रमाच्या अंतर्गत पॉवरपाइंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून कौस्तुभ आमटे यांनी आनंदवनचा संपूर्ण पट उलगडून दाखविला आणि आनंदवनाला शक्य तेवढे सहकार्य करण्याचे आवाहन केले. आनंदवनचे विश्वस्त सुधाकर कडू यांनीही यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Anandvan is a collective invention created from zero - Vikas Amte