घनकचरा व सांडपाण्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
By Admin | Updated: December 23, 2015 01:15 IST2015-12-23T01:15:52+5:302015-12-23T01:15:52+5:30
शहरातील इंंदिरानगर वॉर्डाला समस्यांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. पिण्याच्या पाण्यासह घनकचरा व्यवस्थापन, ...

घनकचरा व सांडपाण्यामुळे स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
गोंडपिंपरी शहर : नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देणार कोण ?
वेदांत मेहरकुळे गोंडपिंपरी
शहरातील इंंदिरानगर वॉर्डाला समस्यांचे माहेर घर म्हणून ओळखल्या जाते. पिण्याच्या पाण्यासह घनकचरा व्यवस्थापन, सांडपाणी विल्हेवाट या अतिसंवेदनशील बाबींसह पथदिवे व रस्त्यांची प्रमुख समस्या येथील नागरिकांची नेहमीच डोकेदुखी ठरली आहे. स्थानिक पातळीवर इंदिरानगर या वॉर्डाचे नगरपंचायत घोषणेनंतर दोन प्रभागात विभाजन झाले असून नव्याने पाडण्यात आलेल्या प्रभागांना अनुक्रमे ४ व ५ असे क्रमांक देण्यात आले आहे.
इंदिरानगर स्थित नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न फारच गंभीर आहे. शहरातील नळयोजना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात वारंवार अपयशी ठरत असून येथील नागरिकांना नेहमीच पाण्यासाठी विहिरी व हातपंपावर जावे लागते. तसेच सदर परिसरात घनकचरा व्यवस्थापन व सांडपाणी विल्हेवाट या प्रमुख बाबींकडे आजवर ग्रामपंचायतीने अक्ष्यम्य दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसून येते. येथील नागरिकांना स्वच्छतेबाबत विचारणा केली असता, गेल्या दोन वर्षांपासून प्रभागातील सांडपाणी नाल्यांची सफाई न केल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरुन याचा विपरीत परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असल्याची माहिती दिली. तसेच प्रभागामधील अंतर्गत रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी करण्यात आलेले खडीकरण रखडले असून ठिकठिकाणी खड्डे व मोठे दगड उघडी पडल्याचे दिसून येते. या सोबत या परिसरात काही ठिकाणचे पथदिवे बंदावस्थेत असल्याने रात्री नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
तसेच प्रभागात सार्वजनिक हातपंप तर आहेत. मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून हातपंप मध्ये ब्लिचिंग पावडर टाकण्यात न आल्यामुळे नागरिकांना दूषित व फ्लोराईड युक्त पाण्याचा वापर करावा लागत आहे. प्रशासनाच्या विविध कल्याणकारी योजना या प्रभागात राबविण्यात आल्या. मात्र भ्रष्टाचाराच्या ग्रहणामुळे विकास कामांनाही गालबोट लागले आहे. आगामी निवडणुक तोंडावर असताना प्रभाग प्रतिनिधीत्व स्वीकारु पाहणाऱ्यांनी आजवर झालेल्या या इंदिरानगर प्रभागावरील अन्यायाबाबत काय लढा दिला, असा सवाल येथील जनतेकडून आज घडीला विचारल्या जात आहे. केवळ जनसेवेचे ढोंग रचून येथील भोळ्या भाबळ्या जनतेच्या भावनांशी खेळ करीत निवडून येणाऱ्या प्रभाग प्रतिनिधींनी आजवर येथील नागरिकांचा भ्रमनिरास करण्यापलिकडे काहीच केले नाही.
या प्रभागांची समस्या सोडविण्याचे तगडे आवाहन नगरपंचायतीसमोर असून नगरपंचायतीच्या पुढील भूमिकेवरच सर्व काही अवलंबून आहे.