एम्टा कंपनीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात जलसमाधी घेणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:52 IST2021-03-13T04:52:33+5:302021-03-13T04:52:33+5:30
भद्रावती : तालुक्यातील बरांज मोकासा व चेक बरांज ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील काही सर्व्हे नंबरमधील शेतीवर प्लॉट पाडून तयार ...

एम्टा कंपनीने केलेल्या फसवणुकीच्या विरोधात जलसमाधी घेणार
भद्रावती : तालुक्यातील बरांज मोकासा व चेक बरांज ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील काही सर्व्हे नंबरमधील शेतीवर प्लॉट पाडून तयार झालेल्या घरांना कर्नाटक एम्टा कंपनीने जिल्हा प्रशासनाला हाताशी घेऊन हे अकृषिक प्लॉट कृषक करून मूळ घर मालक व प्लॉटधारकांची परवानगी न घेता स्वतःच्या नावाने केले. याविरोधात नुकसानीने त्रस्त झालेल्या प्लॉटधारकांच्या वतीने जलसमाधी घेण्याचा इशारा ग्रामस्थांसह शंकरया कालनीडी यांनी जिल्हा प्रशासनाला निवेदनातून दिला आहे.
ही माहिती जुनी पिपरबोडी या गावात ग्रामस्थांनी पत्रकार परिषदेत दिली. या भागात कर्नाटक एम्टा कंपनीने खुल्या कोळसा खाणीकरिता जागा संपादित केली. त्यात मौजा बरांज मोकासा, चेक बरांज, मानोरा या क्षेत्रातील शेतजमिनीवर ५१ प्लाॅट पाडण्यात आले. या सर्व प्लॉटची विक्री सन १९८५ मध्ये झाली. त्यावर सर्व प्लाॅटधारकांनी तेव्हापासून घर बांधून राहणे सुरू केले. ग्रामपंचायतीने त्याठिकाणी सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्यावर ग्रामपंचायतीने करआकारणी केली. असे असताना कंपनीने जिल्हा प्रशासनाला हाताशी घेऊन या अकृषिक प्लॉट कृषक करून मूळ मालक नीळकंठ फाडके व मुरली वांढरे व इतर तीन यांचे नावे दाखवून ती कंपनीच्या नावाने सातबारावर नोंद करून घेतली. हा फेरफार २६ ऑगस्ट २०१८ ला घेण्यात आला. कंपनीने या भागाच्या संपादनासाठी प्रयत्न सुरू केला, तेव्हापासून ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामसभा, मासिक सभेत ठराव घेतले. परंतु, त्यांच्या या ठरावाकडे जिल्हा प्रशासनाने केराची टोपली दाखविली, असा आरोप ग्रामस्थांनी केला. जिल्हा प्रशासनाने गावकऱ्यांना न्याय न दिल्यास प्रशासन आणि कंपनीच्या विरोधात जलसमाधी घेणार असल्याचे ग्रामस्थांसह शंकरया कालनीडी यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य भीमराव कुंमरे, गिरजा पानघाटे, निजामुद्दीन सैय्यद ,सुनील पुसनाके, गजानन पराते, प्रेमदास मडावी, सविता कुमरे, ताईबाई पोराते, गणेश तुमसरे, कुमार रंगास्वामी उपस्थित होते.