रक्कम पूर्ण, मात्र घरकूल अर्धवट

By Admin | Updated: March 25, 2015 01:27 IST2015-03-25T01:27:37+5:302015-03-25T01:27:37+5:30

कोरपना पंचायत समिती अंतर्गत सन २०१० ते २०१४ पर्यंत ५३ ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचे वाटप करण्यात आले.

The amount is full, but the house is half full | रक्कम पूर्ण, मात्र घरकूल अर्धवट

रक्कम पूर्ण, मात्र घरकूल अर्धवट

नांदाफाटा: कोरपना पंचायत समिती अंतर्गत सन २०१० ते २०१४ पर्यंत ५३ ग्रामपंचायतीमध्ये घरकुलाचे वाटप करण्यात आले. यात काही गावातील घरकुलासाठी पूर्ण रक्कमही देण्यात आली. मात्र घरकुलाचे काम अद्यापही पूर्ण झाले नाही. सोबतच सन २०१०- २०१२ पर्यंतच्या मंजूर घरकुलासाठी ६८ हजार रुपये मंजूर असताना तेच घरकुल वाढीव रकमेतील सन २०१३-१४ च्या योजनेत मंजूर झाल्याचे दाखवून ९५ हजारपर्यंत रक्कमेच्या देयकांचे वितरण करण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.
तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये नमुना आठमध्ये पक्क्या घराची नोंद असणाऱ्यांनाही घरकुलाची मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये पिपर्डा, पारधीगुडा, उमरहिरा, कोडशी बु., मांडवा आदी गावांमध्ये घरकुलाची कामे अद्यापही अर्धवट आहे. याबाबत काही महिन्यापूर्वी मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांच्या त्रिस्तरीय समितीने या प्रकरणाची चौकशी केली होती. त्यानंतर आता विधानसभेत आमदार आरीफ नसीम खान यांनी या प्रकरणाला न्याय देण्याचा प्रयत्न केला.
नुकतीच चौकशी समिती कोरपना येथे दाखल झाली असून चार ते पाच अधिकाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता असल्याची माहिती पुढे आली आहे. देयके वाटप करुनही घरकुल पूर्ण न झालेली बहुतांश गावे आदिवासी बहुल भागात असून विचारणा करण्यासाठी आलेल्या लाभार्थ्यांना अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे मिळत असल्याचे समजते. काही ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत ठराव घेऊन गावे बीपीएल यादीतून वगळल्यानंतरही अशा नागरिकांच्या नावे घरकुलाचे वाटप झाले कसे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. तालुक्यात जवळपास २४० ते २५० हून अधिक घरकुलाचे काम अद्यापही अर्धवट असल्याचे समजते. सदर अर्धवट घरकुलाचे काम स्वखर्चाने पूर्ण करण्याची लाभार्थ्यांची ऐपत नसून त्यांना कच्च्या घराचा आसरा घेत कुटुंबाचा उर्दरनिर्वाह करावा लागत आहे. तर कुठे बांबूच्या ताटव्यांमध्ये आदिवासी बांधव राहत आहे. त्रिस्तरीय सदस्य समितीच्या अहवालातून काय निष्पन्न होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (वार्ताहर)

Web Title: The amount is full, but the house is half full

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.