अंबुजा पाणी कराराने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे
By Admin | Updated: December 4, 2014 23:05 IST2014-12-04T23:05:39+5:302014-12-04T23:05:39+5:30
कोरपना तालुक्यात अमलनाला आणि नांदाफाटा पकडीगुड्डम ही दोन मोठी धरणे आहेत. पकडीगुड्डम धरणातील पाणी तालुक्यातील अंबुजा सिमेंट प्रकल्पाला देण्यात यावे, असा करार १९९८ मध्ये युती शासनाच्या

अंबुजा पाणी कराराने मोडले शेतकऱ्यांचे कंबरडे
रत्नाकर चटप - नांदाफाटा
कोरपना तालुक्यात अमलनाला आणि नांदाफाटा पकडीगुड्डम ही दोन मोठी धरणे आहेत. पकडीगुड्डम धरणातील पाणी तालुक्यातील अंबुजा सिमेंट प्रकल्पाला देण्यात यावे, असा करार १९९८ मध्ये युती शासनाच्या काळात झालेला आहे. हा करार करताना प्रथम प्राधान्य पिण्यासाठी, नंतर सिंचन व त्यानंतर उद्योगाला पाणी पुरविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र परिस्थिती याहून उलट असून गेल्या काही वर्षापासून उद्योगाला पाणी मोठ्या प्रमाणात देण्यात येत असल्याने सिंचनाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे.
या धरणाअंतर्गत ३२०० हेक्टर जमिनीवर सिंचन होईल, असे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ११०० ते १२०० हेक्टरवरच अनियमित सिंचन होत आहे. त्यामुळे धरणातील पाण्याचा ५० टक्केही लाभ शेतकऱ्यांना घेताना दिसत नाही तर दुसरीकडे अधिकारी मात्र सिंचन झाल्याची आकडेवारी कागदावर रंगविताना दिसत आहे.
या धरणाअंतर्गत नजिकच्या परिसरातील १७ गावांना पाठपुरावा करण्याचे निर्देश आहे. यासाठी विविध पाणी पुरवठा योजना राबविण्यात आल्या.
मात्र पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे पिपर्डा, धानोली, वडगाव, बेलगाव, आसन, माभा, सोनुर्ली या गावांनी धरणाचे पाणी सिंचनासाठीच द्यावे, असा ठराव ग्रामसभेत करण्यात आला आहे. तालुक्यात कापूस, सोयाबिन, तूूर, गहू, हरभरा व मिरची आदी पिक घेतली जातात. मात्र सिंचनासाठी पाणीच मिळत नसल्याने शेतकऱ्यांची रब्बी पेरणी खोळंबत आहे. काही शेतातील नव्याने उगवलेली रोपे पाण्याअभावी कोमेजताना दिसत आहे. तालुक्यातील ४५००० हेक्टर एकूण पिक क्षेत्र असून केवळ चार ते पाच हजार हेक्टरवरच सिंचन दिसून येते. यामध्ये बोअरवेल, विहीर, नाल्यावरुन सिंचन करण्याऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. हीच परिस्थिती अमलनाला धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांची झालेली आहे. सिंचनासाठी म्हणून ही दोन धरण बांधण्यात आली. परंतु सिंचन होत नसल्याने आता तीव्र भावना उमटताना दिसत आहे.