ही तर मासोळ्यांची सामूहिक आत्महत्याच
By Admin | Updated: January 5, 2016 01:29 IST2016-01-05T01:29:31+5:302016-01-05T01:29:31+5:30
वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात

ही तर मासोळ्यांची सामूहिक आत्महत्याच
सास्ती : वर्धा नदीच्या पात्रात बिल्ट पेपर उद्योगाने रसायनयुक्त पाणी सोडल्याने सास्ती-बल्लारपूर परिसरातील मोठ्या प्रमाणात मासे व इतर जलचर प्राणी मृत झाल्याची घटना १२-१३ नोव्हेंबरला घडली. या संदर्भात तक्रारीही झाल्या. परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानंतर ३-४ दिवसानंतर म्हणजे १६ नोव्हेंबरला प्रदूषण मंडळाकडून चौकशी करण्यात आली व पालकमंत्र्यांना अहवालही दिल्या गेला. त्यात मात्र रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी कारखान्यातून सोडल्या जात नाही तर मासेही मृत झाले नाही, असे म्हटले आहे. त्यामुळे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या चौकशीवर आक्षेप दर्शवित बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते निलेश खरबडे यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाला खुले पत्र लिहीले.
बिल्ट पेपर उद्योगातील रसायनयुक्त औद्योगिक सांडपाणी वर्धा नदीत सोडल्यामुळे १२-१३ नोव्हेंबर रोजी शेकडो मासोळ्यांचा मृत्यू झाला तर हजारो जलचर प्राणी मृत्यूच्या छायेत होते. त्यासंदर्भात ‘लोकमत’ मध्ये वृत्त प्रकाशित होताच काही नागरिकांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्यानंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने सदर घटनेची चौकशी ३-४ दिवसानंतर केली. त्याचा अहवाल पालकमंत्र्यांना पाठविला. परंतु सदर अहवाल पूर्णपणे कारखान्याची पाठराखण करणारा व पालकमंत्र्यांची दिशाभूल करणारा वाटत असल्याने बल्लारपूर येथील निलेश खरबडे यांनी खुले पत्र लिहून चौकशीवर आक्षेप नोंदविला.
घटनेच्या ३-४ दिवसानंतर मृत मासे नदीत आपले वाट पाहतील, अशी अपेक्षा प्रदूषण मंडळाची असावी. घटनेचे वृत्त वृत्तपत्रात प्रकाशित झाल्यावरही सदर उद्योग समुह त्यांच्या चुकीचे प्रमाण मागे सोडतील, असे ही प्रदूषण मंडळाला वाटल्याचे दिसते. शेवटी याबाबत आपला निष्कर्ष खराच असणार. कारण आपण या विषयाचे जाणकार तज्ज्ञ आहात. याबाबत अंकुश ठेवणारे अधिकारीसुद्धा आहात. आम्हा सामान्य नागरिकांच्या ज्ञानाप्रमाणे कारखान्यातील रासायनिक सांडपाण्याने ही घटना घडली असावी, असा आमचा गैरसमज झाला. या गैरसमाजापोटी नाहक आपल्या विभागास पाहणीचे कष्ट करावे लागले. यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. राहीला प्रश्न मेलेल्या माश्यांचा तर त्यांनी सामुहिकरित्या आत्महत्याच केली असावी, असे समजण्यास हरकत नसल्याचे निलेश पांडरंग खरबडे यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाला लिहीलेल्या खुल्या पत्रात म्हटले आहे.
प्रदुषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या अहवालावर अनेकांनी आक्षेप नोंदवित केलेल्या चौकशीची फेरचौकशी करून त्यात दोषींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. (वार्ताहर)