अपंग लाभार्थी शिबिरात साहित्य वाटप
By Admin | Updated: March 24, 2015 00:39 IST2015-03-24T00:39:36+5:302015-03-24T00:39:36+5:30
भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत ३११ गरजू अपंग लाभार्थ्यांना सोमवारी येथे एका कार्यक्रमात साहित्य वाटप करण्यात आले.

अपंग लाभार्थी शिबिरात साहित्य वाटप
चंद्रपूर : भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत ३११ गरजू अपंग लाभार्थ्यांना सोमवारी येथे एका कार्यक्रमात साहित्य वाटप करण्यात आले. जि.प. अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर, उपविभागीय अधिकारी संजय दैने व तहसीलदार गणेश शिंदे उपस्थित होते.
जिल्ह्यातील अपंग गरजू व्यक्तींना आधार मिळण्याच्या दृष्टीकोनातून भारत सरकारच्या उपक्रमाअंतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम (एलिम्को) जबलपूर अंतर्गत, आरोग्य विभाग जि.प. चंद्रपूर, सामान्य रुग्णालय चंद्रपूर, समाज कल्याण कार्यालय जि.प. चंद्रपूर, आय.एम.ए. रोटरी क्लब चंद्रपूर व सुशिलाबाई रामचंद्रराव मामिडवार समाजकार्य महाविद्यालय पडोली चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने स्थानिक ज्युबिली हायस्कूलमध्ये अपंगत्व निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर अपंगत्व निदान शिबिरात आर्टीफीशियल मॅन्युफॅक्चरींग कार्पोरेशन आॅफ इंडिया (एलिम्को) जबलपूर येथील विशेषज्ज्ञ अखिलेश मौर्य, प्रोथेस्टीक अॅन्ड अर्थोस्टी (एलिम्को) जबलपूर विपीन सिंग रावत, मार्केटींग एक्झीकुटीव्ह एलीम्को मुंबई या विशेषज्ञांसह व त्यांच्या चमूने अपंगत्व निदान शिबिरात अपंग, बधिर, अंध आदीची तपासणी केली. व ज्या गरजु अपंग व्यक्तीला साहित्याची आवश्यकता आहे त्यांची नोंद घेतली.
सदर शिबिरात एकुण ३११ गरजु अपंग लाभार्थ्यांना २० मार्च रोजी जिल्हा परिषद अध्यक्षा संध्या गुरनुले, महापौर राखी कंचर्लावार, जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर, यांच्या हस्ते अपंग लाभार्थ्यांना तीन चाकी सायकल, व्हीलचेअर, कुबडी, कृत्रिम हात, पाय, अंध काठी, श्रवण यंत्र, वॉकर, कॅलीपर, क्रचेस आदी साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाप्रसंगी मान्यवरांची विशेष मार्गदर्शनपर भाषणे झाली.
सदर कार्यक्रमाप्रसंगी संध्या गुरनुले यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात असे शिबिर अपंग, मतीमंद, नैसर्गिक व अपघाताद्वारे होणाऱ्या अपंग गोरगरीब जनतेसाठी नेहमीच होणे गरजेचे आहे. त्यामुळे अपंगाना समाजात सन्मानाने जीवन जगता येईल, असे सांगितले.
सदर अपंग लाभार्थी शिबिर साहित्य वाटप कार्यक्रमात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीराम गोगुलवार, सहाय्यक संचालक (कुष्ठरोग) डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा शल्य चिकीत्सक पी.बी. मुरंबीकर, समाज कल्याण अधिकारी विजय वाकुलकर, आयएमएचे राज्य उपाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, ज्युबिला हायस्कूलचे प्राचार्य उद्धव डांगे, व जबलपूर येथील विशेषज्ञ अखिलेश मौर्य, विपीन सिंग रावत यावेळी उपस्थित होते.
यावेळी जबलपूर येथील टिमने अपंग लाभार्थ्यांना साहित्याचा वापर कसा करायचा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच वितरीत करण्यात आलेल्या साहित्याचे व्यवस्थित सेटींग करून लाभार्थ्यास दिले.
सदर शिबिराच्या यशस्वीतेकरिता आरोग्य विभागाचे कर्मचारी, तसेच ज्युबिली हायस्कूलमधील शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)