‘श्रीं’ च्या स्वागतासाठी सर्वच सज्ज

By Admin | Updated: September 5, 2016 00:51 IST2016-09-05T00:51:57+5:302016-09-05T00:51:57+5:30

सर्वांना हवाहवासा गणेशोत्सव उद्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्त अगदी आतूर झाले आहेत.

All ready for 'Shree' | ‘श्रीं’ च्या स्वागतासाठी सर्वच सज्ज

‘श्रीं’ च्या स्वागतासाठी सर्वच सज्ज

चंद्रपूर : सर्वांना हवाहवासा गणेशोत्सव उद्या सोमवारपासून प्रारंभ होत आहे. गणरायाच्या स्वागतासाठी गणेशभक्त अगदी आतूर झाले आहेत. प्रशासनही आपल्या यंत्रणेसह सज्ज आहे. यंदाच्या गणेशोत्सवावर महागाईचे सावट आहेच; मात्र बाजारपेठेत रविवारपासूनच उसळलेली गर्दी पाहू जाता महागाईवर भक्तांच्या उत्साहाने मात केल्याचे दिसत आहे. एकूणच या उत्सावामुळे चांदानगरीत आजपासूनच भक्तीमय वातावरण तयार झाले आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मागील एक महिन्यापूर्वीपासूनच मूर्तीेकार गणेशाच्या मूर्ती बनवायच्या कामाला लागले होते. शुक्रवार, शनिवारला मूर्तीवर अखेरचा हात मारल्यानंतर रविवार मूर्ती बाजारपेठेत आल्या आहेत. मात्र यावेळी गणेशमूर्तीच्या किमती वधारल्या आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत मूर्तीच्या किमती दुपटीने वाढल्याचे आजच्या बाजारभावातून दिसून आले.
यावेळी मूर्तीकारांनाही मूर्ती तयार करताना मोठा त्रास सहन करावा लागला. मूर्तीसाठी यंदा माती आणताना वनविभागाने मज्जाव केल्याचे एका मूर्तीकाराने सांगितले. त्यामुळे अनेक मूर्तीकारांना खेड्यापाड्यातून माती खोदून आणावी लागली. यात दळणवळणाचा वाढलेला खर्च व रंगाच्या वाढलेल्या किमती, यामुळे गणेशमूर्तीच्या किमतीही वाढल्याचे मूर्तीकारांचे म्हणणे आहे. आज बाजारपेठेत ३०० रुपयांपासून पुढे हजारो रुपयांपर्यंतच्या मूर्ती विक्रीसाठी दिसून आल्या.
विशेष म्हणजे, दिवाळीनंतर गणेशोत्सव हा सर्वात मोठा उत्सव समजला जातो. या गणेशोत्सवादरम्यान जिल्हाभरात तब्बल एक हजार ५४५ सार्वजनिक गणेश मंडळ श्रींची स्थापना करणार आहेत. याशिवाय हजारो नागरिकांच्या घरीही गणरायाची स्थापना करून हा उत्सव साजरा केला जातो. पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, दिवे, रोषणाई, पुष्पहार, कृत्रिम हार, फुले, मिठाई आणि जेवणांचा खर्च, यात कोट्यवधींची उलाढाल होते.
गणेशोत्सवादरम्यान कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून प्रशासनही सज्ज झाले आहे. गणेश मूर्तीची सुरक्षा ही मंडळांची जबाबदारी असून त्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या भक्तांची नावे पोलिसांना कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे. परवानगी शिवाय मंडप उभारल्यास प्रशासनाकडून कारवाई करण्यात येणार आहे. गणेश मंडळांना परवानग्या तत्काळ देण्यासाठी धर्मदाय आयुक्त कार्यालयात व्यवस्था करण्यात आली असून यंदा आॅनलाईन नोंदणीही करता येणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी लागू आहे. तरीही गणेशोत्सवाच्या पर्वावर परजिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारूची आयात केली जाण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी दारू तस्कर व विक्रेते यांच्याविरुद्ध तगडी फिल्डींग लावली आहे. प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत विशेष पथक तयार करण्यात आले असून त्यात एक अधिकारी व १० पोलीस शिपाई कार्यरत राहतील. या पथकांची दारू विक्रेत्यांवर करडी नजर असणार आहे.
चंद्रपुरात तीन फुटांपासून १५ ते १८ फूटपर्यंत उंचीच्या मूर्र्तींची स्थापना करण्यात येते. एवढ्या उंचीच्या मूर्ती स्थापनेसाठी व विसर्जनासाठी नेताना रस्ते गुळगुळीत असायला पाहिजे. मात्र चंद्रपुरातील अनेक अंतर्गत रस्त्यावर खड्डे पडले आहेत. शनिवारपर्यंत मनपा प्रशासनाचे याकडे लक्ष नव्हते. आज रविवारी काही रस्त्यावरील खड्डे बुजविताना दिसून येत होते. तरीही अनेक रस्त्यावर खड्डेच असल्याचे दिसून आले. (शहर प्रतिनिधी)

मनपाद्वारे २० कृत्रिम तलाव
शहरातील गणेश मंडळांनी मनपाकडून अधिकृत परवानगी घेतली काय, याची तपासणी करण्यासाठी मनपाने एक पथक तयार केले आहे. हे पथक याची शहानिशा करणार आहेत. त्याचप्रमाणे उत्सवादरम्यान वापरण्यात येणारी मूर्ती ही पीओपीची आहे की मातीची, याबाबतसुद्धा तपासणी करतील. विसर्जनादरम्यान प्रसाद वाटप करण्याकरिता रस्त्यावर स्टॉल लावण्याची परवानगी देण्यात येणार नाही, जल प्रदूषण रोखण्याकरिता मनपाकडून यावेळीसुद्धा निर्माल्याकरिता निर्माल्यकुंड ठेवण्यात येणार आहे. यासोबतच विसर्जनादरम्यान जलप्रदूषण होऊ नये, म्हणून मनपाच्या वतीने शहरात २० कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आली आहे.

मूर्तीच्या किमतीत दुपटीने वाढ मागील वर्षीपेक्षा यावर्षी मूर्तीच्या किमतीत दुपट्टीने वाढ झाली आहे. तसेच त्यासोबत सजावटीसाठी लागणारे साहित्यसुद्वा महागले आहेत. पूजेच्या साहित्यही महाग झाले आहेत. या गणेशोत्सवावर महागाईचे सावट आहेच.
-अ‍ॅड. किशोर देशपांडे, भाविक.

गणेशमूर्तीसाठी यंदा माती सहज मिळाली नाही. वनविभागाने आपल्या जमिनीवरील माती घेण्यास मज्जाव केला होता. त्यामुळे ग्रामीण भागात जाऊन माती आणावी लागली. पूर्वी कारागिर २०० ते २५० रुपये रोजी घेत होता. यंदा ५०० ते ६०० रुपये, सोबत राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था मागतो. याशिवाय ब्रश आणि रंगाच्या किमतीतही वाढ झाली आहे. त्यामुळे सहाजिकच मूर्तीच्या किमती वाढल्या आहेत.
-विनोद झाडे, मूर्तीकार, चंद्रपूर.

८० टक्के पोलीस बंदोबस्तात
पोलिसांच्या दृष्टीने गणेशोत्सवात सर्वात मोठा बंदोबस्त असतो. या उत्सवादरम्यान २० टक्के कर्मचारी ठाण्यात तर ८० टक्के कर्मचारी बंदोबस्तात असतात. चंद्रपूर जिल्ह्यात सहा उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व ठाण्याचे ठाणेदार, दोन हजारांहून अधिक पोलीस कर्मचारी, ७०० होमगार्ड, दंगा नियंत्रण पथक, ३३३८ पोलीस मित्र व नागपूरवरून मागविण्यात आलेले राज्य राखीव पोलीस दलाचे पथक यंदा बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

जनजागृतीचा परिणाम
मागील अनेक वर्षांपासून प्रदूषण टाळण्यासाठी पीओपींच्या मूर्ती तयार करून नका व त्याची स्थापना करू नका, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याविरूध्द दंडात्मक कारवाईदेखील करण्यात येत होती. तरीही मागील वर्षी अनेक ठिकाणी पीओपींच्या मूर्तीच्या स्थापना झाल्याचे दिसून आले. यावर्षी मात्र बाजारात पीओपींच्या मूर्ती दिसून आल्या नाही. काही मूर्तीकारांना याबाबत विचारले असता त्यांनीही पीओपींच्या मूर्ती तयारच करण्यात आल्या नाही, असे सांगितले. अपवादात्मक काही ठिकाणी या मूर्ती दिसतील. मात्र जनजागृतीमुळे त्याचे प्रमाण अतीशय कमी झाल्याचे दिसून आले.

विक्रीसाठी विशेष व्यवस्था
श्रींच्या मूर्तीची विक्री करण्यासाठी शहरात अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. आझाद बागेच्या बाजुला सुमारे २० ते २५ स्टॉल उभारण्यात आले आहेत. याशिवाय ज्युबिली हायस्कूलजवळ, छोटाबाजार परिसरात, जटपुरा गेट, बंगाली कॅम्प, बाबुपेठ परिसर, पठाणपुरा परिसर, गांधी चौक या ठिकाणीदेखील गणेश मूर्ती विक्रीसाठी मनपा प्रशासनाकडून व्यवस्था करण्यात आली आहे.

Web Title: All ready for 'Shree'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.