विकासासाठी सर्व शक्ती पणाला लावणार

By Admin | Updated: September 5, 2016 00:53 IST2016-09-05T00:53:17+5:302016-09-05T00:53:17+5:30

जनतेचे रक्षण करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था उत्तम असावी...

All the powers will be used for development | विकासासाठी सर्व शक्ती पणाला लावणार

विकासासाठी सर्व शक्ती पणाला लावणार

सुधीर मुनगंटीवार : पोलीस वसाहतीच्या बांधकामाचे भूमिपूजन
चंद्रपूर : जनतेचे रक्षण करण्यासोबतच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या निवासाची व्यवस्था उत्तम असावी या दृष्टीने १०२ कोटी रूपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेच्या रक्षणासाठी परिश्रम घेणाऱ्या पोलीेस दलाच्या पाठिशी शासन खंबीरपणे उभे आहे. विकासासाठी आपण आजवर सर्व शक्तीनिशी परिश्रम घेतले आहे. यापुढेही विकासासाठी सर्व शक्ती आपण पणाला लावू, अशी ग्वाही वित्तमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.
चंद्रपूर येथे नव्याने बांधण्यात येणाऱ्या पोलीस वसाहतीच्या भूमीपूजन कार्यक्रमात पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार बोलत होते. या वसाहतीतील ३६४ क्वॉर्टर्सच्या बांधकामाचे भूमीपूजन सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, आ.नाना श्यामकुळे, विशेष पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम, पोलीस अधिक्षक डॉ. संदीप दीवाण, जिल्हा परिषदेचे सभापती देवराव भोंगळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक हेमराज राजपूत, पोलीस गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अभियंता डेकाटे आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. मुनगंटीवार पुढे म्हणाले, यापूर्वी चंद्रपूर तालुक्यातील पडोली पोलीस स्टेशन, नागभीड तालुक्यातील तळोधी (बाळापूर) येथील पोलीेस स्टेशनचे बांधकाम आपण पूर्ण केले आहे. सायबर क्राईम लॅब आपण प्रथमत: चंद्रपुरात सुरू केली. बल्लारपूर येथे अत्याधुनिक पोलीस स्टेशनच्या बांधकामाला आपण मंजुरी दिली आहे. पोलिसांसाठी व्यायामशाळेकरिता निधी आपण मंजूर केला असून याठिकाणी येत्या काळात उत्तम वॉकींग ट्रॅक तयार करण्यात यावा, जिल्ह्यात ज्या पोलीस स्टेशन इमारतींचे बांधकाम करावयाचे असेल त्याबाबतचा प्रस्ताव पोलीस अधिक्षकांनी सादर करावा. आपण यासाठी निधी कमी पडू देणार नाही, असेही ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. पोलीस वसाहतीच्या इमारतीचे बांधकाम हे सर्वोत्तम दर्जाचे व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करत गुणवत्तेबाबत कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही, असेही ना. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर शहरात बाबुपेठ येथे रेल्वे उड्डाण पुलाचे बांधकाम, दाताळा येथे पुलाचे बांधकाम, चंद्रपूर-बल्लारपूर मार्गावर केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या माध्यमातून राज्यातील दुसरी सैनिक शाळा अशी विकासाची मोठी मालिका आपण तयार केली आहे. चंद्रपूर जिल्हयाच्या विकासासाठी आपण प्रयत्नांची शर्थ करू. मंत्रीपद जनतेच्या सेवेसाठी असून विकासालाच आपले सर्वोच्च प्राधान्य राहील, असेही ना. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले.
यावेळी बोलताना केंद्रीय गृह राज्यमंत्री ना. हंसराज अहीर म्हणाले, जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या पोलीस कर्मचारी व अधिकारी वर्गाच्या पाठिशी केंद्र व राज्य सरकार खंबीरपणे उभे असून त्यांना कोणतीही अडचण आम्ही भासु देणार नाही. यावेळी आ.नाना शामकुळे, पोलिस अधिक्षक डॉ. संदीप दिवाण, मुख्य अभियंता डेकाटे यांचीही समयोचित भाषणे झालीत. यावेळी सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन विकास मुंढे यांनी केले. कार्यक्रमाला पोलिस अधिकारी, कर्मचारी व नागरिकांची मोठया संख्येने उपस्थिती होती.

Web Title: All the powers will be used for development

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.