मार्डा-एकोना प्रकल्पग्रस्तांचा वेकोलिविरूद्ध एल्गार
By Admin | Updated: August 19, 2016 01:52 IST2016-08-19T01:52:15+5:302016-08-19T01:52:15+5:30
वरोरा तालुक्यातील एकोना-मार्डा येथील कोळसा खाण सुरू होत आहे. त्याकरिता अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीन या प्रकल्पामध्ये गेली आहे.

मार्डा-एकोना प्रकल्पग्रस्तांचा वेकोलिविरूद्ध एल्गार
अधिकाऱ्यांना निवेदन : काम बंद ठेवण्याची मागणी
वरोरा : वरोरा तालुक्यातील एकोना-मार्डा येथील कोळसा खाण सुरू होत आहे. त्याकरिता अनेक शेतकऱ्यांच्या शेतजमीन या प्रकल्पामध्ये गेली आहे. त्याचा काहींना मोबदलासुद्धा देण्यात आला आहे. परंतु नियमाप्रमाणे प्रकल्पग्रस्तांना नोकरी आणि अनुदान एकाचवेळेस देणे गरजेचे असताना नियमाला बगल देत काम सुरू करण्याचा प्रयत्न वेकोलि प्रशासनाने केलेला आहे. त्याविरोधात प्रकल्पग्रस्तांनी उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलीस अइधकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.
वेकोलिचे उपक्षेत्र व्यवस्थापक शुक्ला, खाण व्यवस्थापक जांभूळकर व इतर अधिकारी सर्वेक्षण करण्यासाठी बुधवारी सकाळी आले असता काही शेतकऱ्यांनी त्यांची अडवणूक केली. त्यांना नोकरी व अनुदानाबाबत विचारणा केली. तेव्हा अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. या वादाचे पर्यावसन भांडणात झाले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार देऊन प्रकल्पग्रस्तांना नोकरीचा मार्ग बंद करण्याचा इशारा दिला. त्याविरोधात सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन वरोरा उपविभागीय अधिकारी लोंढे व उपविभागीय पोलीस अधिकारी पवार यांना लेखी निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, वेकोलि प्रशासनाने अगोदर नोकरी व अनुदान द्यावे तसेच कोणाही शेतकऱ्यांना याप्रकारे धमकी देण्यात येऊ नये. जर याच प्रकारे वेकोलि प्रशासनाचे धोरण राहिल्यास बेमुदत आंदोलन करण्यात येईल. तसेच मागण्या पूर्ण होईपर्यंत खाणीचे काम बंद ठेवण्यात यावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. (शहर प्रतिनिधी)