दारूविक्री ठरणार गावकऱ्यांसाठी धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:30 IST2021-04-23T04:30:15+5:302021-04-23T04:30:15+5:30
गोवरी : संचारबंदीच्या काळात सध्या गोवरी गावात दारूचा महापूर सुरू आहे. गावातील काही दारू विक्रेत्यांना जिल्ह्याबाहेरून व तेलंगणा सीमेलगत ...

दारूविक्री ठरणार गावकऱ्यांसाठी धोकादायक
गोवरी : संचारबंदीच्या काळात सध्या गोवरी गावात दारूचा महापूर सुरू आहे. गावातील काही दारू विक्रेत्यांना जिल्ह्याबाहेरून व तेलंगणा सीमेलगत असलेल्या गावातून दारू तस्कर गोवरी येथील अवैध दारू विक्रेत्यांना दारू पुरवठा करीत असल्याची माहिती आहे. या दारूमुळेही कोरोना संसर्ग वाढण्याची भीती आहे. यामुळे गावकऱ्यांत कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे.
कोरोनामुळे गावाला प्रतिबंधित क्षेत्र घोषित केल्यानंतरही अवैध दारूविक्री जोरात सुरू आहे. कोरोना संसर्गामुळे राज्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. लॉकडाऊनचे नियम सर्वांना पाळणे बंधनकारक आहे. कोरोना संसर्गाचा धोका होऊ नये म्हणून जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तरीही पोलिसांना भूलथापा देत यवतमाळ व तेलंगणा राज्यातून छुप्या मार्गाने दारूची तस्करी सुरू आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाने काळजी घेतली आहे. जिल्ह्यातून अवैध दारूचा पुरवठा होत असल्याने गोवरी येथील नागरिक त्रस्त आहे. गावात अवैध विक्रीच्या माध्यमातून गोवरी येथे दारूचा महापूर सुरू आहे. गावात सकाळी व संध्याकाळी दारू पिणाऱ्या नागरिकांची मोठी वर्दळ पाहायला मिळत आहे. गावाच्या सभोवताल दारू विक्रेत्यांनी आपले जाळे घट्ट केले आहे. त्यासाठी स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.