साऊंड बॉक्समधून दारु तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 22:13 IST2018-11-28T22:12:47+5:302018-11-28T22:13:04+5:30
दारुबंदी झाल्यानंतर दारुविक्रेत्यांनी विविध मार्गाने दारुची तस्करी सुरु केली. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असाच आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे. चारचाकी वाहनातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला दारुसाठा जप्त केला.

साऊंड बॉक्समधून दारु तस्करी
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : दारुबंदी झाल्यानंतर दारुविक्रेत्यांनी विविध मार्गाने दारुची तस्करी सुरु केली. मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने असाच आणखी एक प्रकार उघडकीस आणला आहे. चारचाकी वाहनातील साऊंड बॉक्समध्ये लपवून ठेवलेला दारुसाठा जप्त केला. यावेळी वाहनात विविध ठिकाणी दारु वाहतूक करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या कप्प्यामधून ९५० बॉटल देशी दारुच्या बॉटल जप्त केल्या. ही कारवाई स्थानिक काळामंदिर परिसरात करण्यात आली असून गाडीमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका चारचाकी वाहनातून दारुची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर त्यांनी सापळा रचून विशेष पथक तयार केले. त्यानंतर स्थानिक समाधी वॉर्ड काळाराम मंदिर येथे नाकाबंदी केली. यावेळी वाहनाची तपासणी सुरु केली. दरम्यान एम एच ३४ के ३६९८ या क्रमांकाच्या वाहनाची तपासणी केली. दरम्यान गाडीमध्ये साऊंड बॉक्स आढळून आला. यावेळी पोलिसांनी साऊंड बॉक्स उघडून बघितला असता. त्यामध्ये देशी दारु आढळून आली. दरम्यान पोलिसांनी गाडीची कसून तपासणी केली असता, गाडीमध्ये विशेष कप्पे तयार केल्याचे आढळून आले. दरम्यान पोलिसांनी त्या कप्प्याची पाहणी करुन दारुसाठा जप्त केला. यावेळी गाडीमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांच्या नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर अंभोरे, पोलीस उपनिरिक्षक बोरकुटे, दौलत चालखुरे पद्माकर कांबळे, जुमानाके यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकांनी केली.