गुजरात, मध्य प्रदेशातील दारू चंद्रपुरात
By Admin | Updated: August 3, 2015 00:38 IST2015-08-03T00:38:58+5:302015-08-03T00:38:58+5:30
१ एप्रिलपासून दारूबंदी झाली असली तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारू आणली जात आहे.

गुजरात, मध्य प्रदेशातील दारू चंद्रपुरात
४० लाखांची दारू जप्त
ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई
चंद्रपूर: १ एप्रिलपासून दारूबंदी झाली असली तरी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर दारू आणली जात आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर पोलिसांच्या एका विशेष पथकाने बल्लारपूर मार्गावर बाबुपेठलगत एका वाहनातून तब्बल २६ लाख रुपयांची दारू जप्त केली तर, राजुरा पोलिसांनी १४ लाखांचा दारूसाठा जप्त केला. दोनही कारवाईत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे.
चंद्रपुरात पकडण्यात आलेली दारू गुजरातमधील वापी येथून तर राजुऱ्यात जप्त करण्यात आलेली दारू मध्य प्रदेशातील शिवणी येथून आणण्यात आली असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी येथे रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. गोपनिय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. येत्या ४ आॅगस्टला जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात दारू येण्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी प्रल्हाद गिरी यांच्या नेतृत्वात एका विशेष पथकाचे गठण केले. दरम्यान, या पथकाने शनिवारी मध्यरात्रीनंतर बाबुपेठ परिसरातून बल्लारपूरकडे जाणाऱ्या एका मिनी ट्रकला अडविले. सदर ट्रकच्या चालकाजवळ वाहनामध्ये कागद वाहून नेण्याचा परवाना आढळून आला. मात्र पथकाचा संशय बळावल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता पोलीस अक्षरश: चक्रावून गेले. या ट्रकमध्ये २६ लाख ३२ हजार रुपये किंमतीचा दारूसाठा पोलिसांना गवसला. याप्रकरणी पोलिसांनी पंकज चऱ्हाटे व विक्की शर्मा या दोघांना अटक करण्यात आली आहे. ही दारू बल्लारपूर येथील शेख मुजीर नामक ईसमाकडे जात होती, असे चौकशीत निष्पन्न झाले असल्याचे संदीप दिवाण यांनी पत्रकारांना सांगितले. या पत्रकार परिषदेला उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी, शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप सिरस्कर, शहर पोलीस ठाण्याचे डी.बी. पथक प्रमुख राहूल बोंद्रे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मध्य प्रदेशातून येणारी
१४ लाखांची दारू जप्त
राजुरा: राजुरा तालुक्यात मागील एका महिन्यात सास्ती, मानोली परिसरातून जाणाऱ्या एका वाहनातून पोलिसांनी १४ लाखांची दारू जप्त केली आहे. ही कारवाई सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वात करण्यात आली असून एकूण २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे. रविवारी पहाटे दोन वाजता मध्यप्रदेशातून गोवरी- मानोली परिसरात दारूचा ट्रक येत असल्याची गोपनिय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून मानोली शिवारात वाहनाची तपासणी केली. त्यात हा दारूसाठा आढळून आला. याप्रकरणी भादंवि कलम ६५ (ई), ६६ (१) ब ८३ नुसार गुन्हे दाखल करून आठ आरोपींना अटक करण्यात आली. ही दारू गोवरी- मानोली परिसरात कुणाला देण्याकरिता आणण्यात आली, याचा तपास पोलीस करीत आहेत. ४ आॅगस्टला राजुरा तालुक्यातील २८ ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणुकीसाठी तर ही दारू आली नाही ना, याची चौकशी पोलीस करीत आहे. मध्यप्रदेशातील शिवणी येथून मुरमुरे भरुन ट्रक चंद्रपूर जिल्ह्याकडे निघाला होता. मध्यप्रदेशातून येताना अनेक नाके लागतात. परंतु नेमके गावात पोहचल्यानंतरच दारू पकडल्या जात असल्याने दारू आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राजुरा तालुक्यात अनेक सीमावर्ती क्षेत्र लागून असून आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, दिवदमण, बारामती या क्षेत्रातून दारूची तस्करी होत असल्याची अनेक प्रकरणे उघडकीस आलेली आहेत. आजच्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू जप्त करण्यात आली. या घटनेचा तपास राजुरा पोलीस करीत आहेत.
अपघातासह अन्य गुन्ह्यात झाली घट
दारूबंदीनंतर जिल्ह्यात दारू येत असली तरी अपघातासह कौटुंबिक गुन्ह्यातही मोठ्या प्रमाणात घट झाल्याची माहिती संदीप दिवाण यांनी पत्रकाराशी बोलताना दिली. सन २०१४ मधील एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यांतील अपघाताची आकडेवारी पाहत सन २०१५ मधील एप्रिल, मे, जून, जुलै या चार महिन्यात अपघातांची संख्या ६१ ने घटली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
पाच हजारांचा रिवॉर्ड
उपविभागीय पोलीस अधिकारी प्रल्हाद गिरी यांचे विशेष पथक व राजुरा पोलिसांचे पथक या दोनही पथकांना जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप दिवाण यांनी प्रत्येकी पाच हजार रुपयांचा रिवॉर्ड जाहीर केला आहे.
चार महिन्यात ३० हजार लिटर दारू जप्त
जिल्ह्यातील दारूबंदीनंतर पोलिसांनी दारू तस्करांच्या मुसक्या आवळणे सुरू केले. ठिकठिकाणी नाकाबंदी करून कारवाई सुरू केली. गेल्या चार महिन्याच्या कालावधीत पोलिसांनी जिल्हाभर कारवाया करून सुमारे ३० हजार लिटर दारू जप्त केल्याची माहिती संदीप दिवाण यांनी यावेळी दिली.
तस्करीसाठी ट्रकचा वापर वाढला
दुचाकी आणि कारसारखी वाहने पोलिसांकडून तपासली जात असताना आता तस्करांनी दारू आणण्यासाठी नवी युक्ती शोधून काढली आहे. अलिकडे ट्रकमधून दारू आणण्याचे प्रमाण वाढले असल्याचे दिसून आले आहे. मागील काही दिवसांत करण्यात आलेल्या कारवायांमध्ये दारूसाठी ट्रकचाच वापर केल्याची बाब पुढे आली आहे.