वर्धा नदीवर शिवनीजवळ हवा बंधारा
By Admin | Updated: June 21, 2015 01:59 IST2015-06-21T01:59:02+5:302015-06-21T01:59:02+5:30
वर्धा नदीपट्टयातील शेतीचे सिंचन व्हावे तथा परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा,

वर्धा नदीवर शिवनीजवळ हवा बंधारा
चंद्रपूर : वर्धा नदीपट्टयातील शेतीचे सिंचन व्हावे तथा परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटावा, या हेतुने चंद्रपूर शहरापासून केवळ आठ कि.मी. अंतरावरील तालुक्यातील शिवनी (चोर) येथे वर्धा नदीवर बंधारा बंधण्याची मागणी येथील गावकऱ्यांकडून होत आहे. यासाठी शिवणी येथील शेतकऱ्यांनी स्वाक्षरी मोहिमेतून प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.
वर्धा नदीपट्ट्यातील जमीन सुपीक असून शेतीला सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाल्यास येथील शेती समृद्ध होऊन शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावू शकते. २० वर्षापूर्वी हडस्ती, धानोरा (पिपरी) आणि शिवनी (चोर) येथे वर्धा नदीवर उपसा जलसिंचन योजना कार्यरत होती. मात्र कालांतराने या तिनही योजना बंद पडल्या. बंद सिंचन योजना पुन्हा सुरू करण्यासाठी या गावातील शेतकऱ्यांनी स्थानिक आमदारांकडे मागणी केली. मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. या परिसरात वेकोलिच्या खाणींमुळे भुगर्भातील पाण्याची पातळी आधीच खोलवर गेली आहे. शिवनी येथे वर्धा नदीवर बंधारा झाल्यास परिसरातील भुगर्भातील पाण्याची पातळी वाढण्यासोबतच नदीपलीकडील राजुरा व कोरपना तालुक्यातील गावांसोबरोबरच चंद्रपूर व बल्लारपूर तालुक्यातील गावांना सिंचनाचा लाभ होईल. तथा पिण्याच्या पाण्याचीही सोय होईल. २००३ च्या सुमारास शिवनी-मार्डा परिसरात बॅरेज बांधकामासाठी सर्वेक्षणसुद्धा झालेले आहे. मात्र पाठपुराव्याअभावी सदर प्रस्ताव थंडबस्त्यात गेला. वर्धा नदीपट्यातील आजवर अत्यंत मागास राहिलेल्या या भागात कोणताही सिंचन प्रकल्प नसल्यामुळे या परिसरातील शेतजमीन सुपीक असूनही सिंचनापासून वंचित राहिलेली आहे. या पार्श्वभुमीवर शिवणी येथे बंधारा मंजूर करण्याची मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी (ओबीसी विभाग) अध्यक्ष उमाकांत धांडे यांनी केली आहे.
जिल्ह्यातील सिमेंट उद्योग, औष्णिक वीज प्रकल्प, पोलाद उद्योग व एमआयडीसीतील लघु उद्योगांद्वारा वर्धा नदीतून होणारा पाण्याचा उपसा व भविष्यातील पाण्याची निकड विचारात घेऊन तसेच शेती सिंचन आणि परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न लक्षात घेता वर्धा नदीवर चंद्रपूर जिल्ह्यात एकुण ७ बॅरेजस्ची शृंखला प्रस्तावित आहे. यात दिंडोरा व मार्डा (त. वरोरा), तेलवासा (त. भद्रावती), धानोरा (त. चंद्रपूर), हडस्ती व आमडी (त. बल्लारपूर), आर्वी धनूर (त. गोंडपिपरी) यांचा समावेश आहे. सदर प्रकल्प जलसंपदा विभाग वा स्थानिक उद्योगांच्या सहभागातून प्रस्तावित असल्याचे विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने राजुराचे माजी आमदार प्रभाकर मामुलकर यांना पत्राद्वारे कळविलेले आहे. मात्र सिंचाई विभागाच्या अनास्थेमुळे बराच कालावधी लोटूनही मार्डा (त. वरोरा) वगळता इतर प्रकल्पांचे काम अद्याप सर्व्हेक्षणाच्या पुढे गेलेले नाही.
शेतकऱ्यांचे हित लक्षात घेता आणि शेती समृद्ध होण्यासाठी सदर बंधाऱ्याच्या श्रृंखलेत वर्धा नदीवर शिवनी येथील बंधाऱ्याचाही समावेश करून त्यालादेखील मंजुरी द्यावी, अशी मागणी चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमेटी (ओबीसी विभाग) अध्यक्ष उमाकांत धांडे, संदीप डाखरे, लक्ष्मण एकरे, किशोर ढुमणे, रवींद्र चटके, गजानन भोंगळे, विनोद झाडे, संजय उमरे, रामदास पाटील उपरे, रमेश पाटील झाडे, बळीराम वैद्य, रतन वैद्य, मंगेश भोयर, सुरेश पोडे, दौलत घटे, उत्तम बोबडे, अरूण उरकुडे, साईनाथ देठे, नत्थु पाटील बोबडे, लहु पाटील भोयर, कवडू पाटील कौरासे आदींसह गावकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)