मालमत्ता कर मूल्यांकनावरून हवा तापली
By Admin | Updated: March 15, 2016 01:59 IST2016-03-15T01:59:38+5:302016-03-15T01:59:38+5:30
चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील करमूल्यांकनाच्या मुद्यावरून हवा बरीच तापली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी

मालमत्ता कर मूल्यांकनावरून हवा तापली
उपोषण थांबवा, चर्चेला या
चंद्रपूर : चंद्रपूर महानगर पालिकेच्या हद्दीतील करमूल्यांकनाच्या मुद्यावरून हवा बरीच तापली आहे. काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे दिवस लांबत चालले तस-तसे वातावरण तापत आहे. १८ तारखेला मनपाच्या सभागृहात होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर आठवा दिवस उजाडला असताना, महापौर आणि स्थायी समितीच्या सभापतींंनी उपोषण थांबवा आणि चर्चेला या, अशी विनंती करीत उपोषणस्थळी येवून निवेदन दिले. त्यावर आता ही मंडळी काय निर्णय घेणार याकडे, अनेकांचे लक्ष लागले आहे.
सोमवारी या साखळी उपोषणाचा आठवा दिवस होता. या दरम्यान, सायंकाळच्या सुमारास स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, भाजपाचे गटनेता अनिल फुलझेले, शिवसेनेचे गटनेता संदीप आवारी आदींनी गांधी चौकातील उपोषण मंडपाला भेट दिली. या प्रसंगी महापौर राखी कंचर्लावार यांच्यासह स्थायी समितीचे सभापती संतोष लहामगे, भाजपाचे गटनेता अनिल फुलझेले, शिवसेनेचे गटनेता संदीप आवारी यांची स्वाक्षरी असलेले एक निवेदन काँग्रेसचे गटनेता प्रशांत दानव यांच्याकडे सोपविले. या निवेदनातून त्यांनी हे साखळी उपोषण थांबविण्याची विनंती केली असून करमुल्यांकनात का वाढ करावी लागली, याची किरणमिमांसा केली आहे. २१ मे २०१५ च्या मनपाच्या सर्वसाधारण सभेतील ठराव क्रमांक १५ नुसार ही करवाढ केली असून मालमत्ता करात वाढ दिसण्याची कारणेही या निवेदनातून सांगिण्याचा प्रयत्न केला आहे.
तरीही करवाढीवर आक्षेप असल्यास चर्चेतून मार्ग काढता येईल. ना. मुनगंटीवार, ना. अहीर यांनी दिलेल्या सूचनेनुसार १८ मार्चला सभेचे आयोजन केले आहे. त्यामुळे उपोषण थांबवा आणि सभेत चर्चेला या, असे यावेळी सांगण्यात आले.
आता या निमंत्रणावर आणि निवेदानावर उपोषणकर्ती मंडळी काय निर्णय घेणार हे महत्वाचे आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
विशेष सभा बोलवा, तरच चर्चा
चंद्रपूर : उपोषण थांवा आणि चर्चेेला या असे निमंत्रण सत्ताधाऱ्यांकडून आले असताना काँग्रेसच्या नगरसेवकांनी मात्र आधी महानगर पालिकेची विशेष सभा बोलवा, त्या नंतरच चर्चा होईल, असा पवित्रा घेतला आहे. यामुळे या मागणीचा महापौर आणि सत्ताधारी गट कसा विचार करणार, हे महत्वाचे आहे.
काँग्रेसचे मनपातील गटनेते प्रशांत दानव यांनी सोमवारी दुपारी महापौर आणि मनपा आयुक्तांना काँग्रेस नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्यांसह एक पत्र दिले. या पत्रातून त्यांनी मालमत्ता करावर चर्चा करण्यासाठी विशेष सभेचे आयोजन करण्याची मागणी केली आहे. या पत्रातून त्यांनी महानगर पालिकेने वाढविलेल्या भरमसाठ करावर आक्षेप घेतला आहे. या भरमसाठ करवाढीमुळे जनतेमध्ये आक्रोश निर्माण झाला असल्याने या अन्यायाच्या विरोधात हे आंदोनाचे पाऊल उचलल्याचे त्यांनी म्हटले आहे.
काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुरू केलेल्या आंदोलनाला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी पाठिंबा दिला असल्याने हा प्रश्न आता सामूहिक झाला आहे. कोअर प्रोजेक्ट इंजिनिअर्स अँड कंपनीला करमुल्यांकनाच्या कामाचे कंत्राट दिले असून या कंपनीने तांत्रिक दृट्या काम योग्य केले नाही.
कसलाही अनुभव नसताना या कंपनीला सहा कोटी रूपयांमध्ये हे सर्व्हेक्षणाचे काम दिले आहे. त्यामुळे यावर चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत या पत्रातून मांडले आहे. जनतेवर लादलेल्या मालमत्ता करासंदर्भात चचार करण्यासाठी विशेष सभेतूनच निर्णय होणे महत्वाचे असल्याचे मतही या पत्रातून त्यांने मांडले आहे. या पत्रावर प्रशांत दानव यांच्यासह २० नगरसेवकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
काँग्रेस नगरसेवकांच्या या मागणीची दखल कशी घेतली जाते यावर या साखळी उपोषणानंतरचे आंदोलन अवलंबून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)