विकासापासून उपेक्षित गेवरा परिसराला हवा न्याय
By Admin | Updated: October 29, 2015 01:35 IST2015-10-29T01:35:43+5:302015-10-29T01:35:43+5:30
सावली तालुका मुख्यालयाच्या शेवटच्या टोकावरील गेवरा परिसरातील ‘त्या’ २४ गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आजतागायत एकाही राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता पुढे आला नाही.

विकासापासून उपेक्षित गेवरा परिसराला हवा न्याय
प्रकाश काळे गेवरा
सावली तालुका मुख्यालयाच्या शेवटच्या टोकावरील गेवरा परिसरातील ‘त्या’ २४ गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी आजतागायत एकाही राजकीय पक्षाचा स्थानिक कार्यकर्ता पुढे आला नाही. किंवा कुणी लोकप्रतिनिधी व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे ज्वलंत प्रश्न सुटणे कठीण आहे.
प्रत्येक ग्रामपंचायत ते जिल्हा परिषद, पंचायत समिती, विधानसभा, लोकसभा त्याचसोबत सेवा सहकारी सोसायट्या इत्यादीसाठी होणाऱ्या निवडणूकांमध्ये मात्र वरिष्ठ स्तरापासून ते गावस्तरापर्यंतचे सर्वच नेते व स्वघोषित कार्यकर्ते आपली प्रतिष्ठा पणाला लावतात.प्रत्येक मतदाराला प्रलोभीत करीत असतात. शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून तर सर्वच स्थानिक समस्यांचे ओझे डोक्यावर घेवून निवडणुकात फिरत असतात. एकदाच्या निवडणूका संपल्या की दिलेले सर्व आश्वासने, प्रलोभने तिथेच विसरून निवांत पाच वर्षांपर्यंत स्वत:चा विकास करण्यासाठी धडपडताना दिसतात.
हीच परिस्थिती या भागातील दोन्ही पंचायत समिती क्षेत्र निमगाव-विहिरगाव तसेच पालेबारसा-अंतरगाव आणि दोन्ही संबंधीत जिल्हा परिषद क्षेत्रातील करोली आकापूर, खानाबाद, गेवरा खुर्द, गेवरा बुज, विहीरगाव, बोरमाळा, चिखली, डोंगरगाव, निफंद्रा, बारसागड, मेहा सायखेडा, उसरपारचक, सावंगी दीक्षित, उसरपार तुकूम, पालेबारसा, जनकापूर तुकूम, जनकापूर रिठ, भानापूर, आसोला, अंतरगाव, गायडोंगरी, निमगाव या गावातील आहे. विकासाचा पॅरामीटर बघितल्यास भीषण वास्तव समोर येते. यापूर्वी सुद्धा लोकमतने या २४ ही गावांची वास्तविकता समोर आणली. त्याबाबतचे निवेदन विहीरगाव येथील जनतेच्या पुढाकाराने २४ गावाच्या वतीने ना. सुधीर मुनगंटीवार यांनाही देण्यात आले. निवेदनातून शेतकऱ्यांच्या वास्तविकतेची परिस्थिती नमूद करून या भागात अत्यल्प झालेल्या पावसाने रोवणी होवू शकली नाही. जे पीक जगले त्यांना रोगांनी संपविले. पिकांसाठी धडपडणारा शेतकरी आता कर्जबाजारी झाला असून दुष्काळ परिस्थितीस सामोरे जात आहे. गावनिहाय सर्व्हेक्षण करून वस्तुनिष्ठ शेतकऱ्यांची स्थिती समजून घेवून दुष्काळग्रस्त गावे जाहीर करणे गरजेचे आहे. याबाबत ना. सुधीर मुनगंटीवार यांनी स्वत: जातीने लक्ष घालावे, अशी सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे. स्थानिक आमदार हे विरोधी पक्षाचे असून या सावली-ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रात हा भाग येत असल्याने राज्य आणि केंद्रात समांतर सत्ता असताना स्थानिक आमदार नेहमी विरोधी पक्षाचाच असल्याची परंपरा आहे. हेही एक राजकीयदृष्ट्या या भागाचे उपेक्षेचे कारण ठरू शकते. लोकनेता कोणत्याही पक्षाचा असावा, सत्ता कोणत्याही पक्षाची असावी. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या समस्यांकडे गांभीर्याने बघितले पाहिजे. परंतु या भागातील जनतेच्या नशिबी हे भाग्य नाही. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप याच राजयुद्धामध्ये या भागातील मतदार शेतकरी कायम मारल्या जात आहे. या भागातील जनतेचे जीवनमान शेतीवरच अवलंबून आहे. शेतीला सिंचनाची कायमस्वरूपी पुरेशी व्यवस्था नाही. पालेबारसा अंतरगाव परिसरात आसोलामेंढा मध्यम सिंचन प्रकल्प आहे. याचा या परिसरातील एकाही गावाला सिंचनाच्या दृष्टीने फायदा नाही. उलट आणेवारीवर परिणाम होतो. निमगाव-विहीरगाव पंचायत समिती क्षेत्रातील गावांना राजस्व मंडळातील व्याहाडमधील वाघोली बुटी सिंचन प्रकल्पाचा मार खावा लागतो. त्यामुळे येथेही आणेवारीवर परिणाम होतो. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी या भागातील राजकीय पक्षांची उणीव भासावी, हे दुर्दैवच.