सिंदेवाही तालुक्यात शेती व्यवसाय धोक्यात
By Admin | Updated: December 7, 2014 22:48 IST2014-12-07T22:48:54+5:302014-12-07T22:48:54+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे.

सिंदेवाही तालुक्यात शेती व्यवसाय धोक्यात
सिंदेवाही : चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुका हा धान उत्पादक तालुका व धानाचे आगार म्हणून ओळखला जातो. मागील तीन वर्षांपासून रासायनिक खते, किटकनाशक औषधे, बी-बियाणे, मजुरीत वाढ झाली आहे. अशातच धानाचे घसरलेले भाव व उत्पादन खर्चात झालेली वाढ, त्यामुळे धान पीक शेती व्यवसाय धोक्यात आला आहे. नैसर्गीक आपत्तीमुळे खचलेल्या व आर्थिक संकटात सापडलेला शेतकरी चिंतातूर झाला आहे.
केंद्र व राज्य शासनाच्यावतीने खचलेल्या शेतकऱ्यांनी आत्महत्येकडे न वळता शेतकऱ्यांत हिंमत यावी यासाठी विविध पॅकेज देण्यात आले. तरीही विदर्भातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. याकरिता शासनाने आत्मचिंतन करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना शेतमालाला भाव दिला तरत शेतकरी सावरू शकतो, अशी स्थिती आहे.
सध्या सिंदेवाही तालुक्यात श्रीराम धानाला एक हजार ९०० रुपये प्रती क्विंटल भाव आहे. गेल्या वर्षी डिसेंबर २०१३ मध्ये श्रीराम धानाला दोन हजार ५०० रुपये प्रती क्विंटल भाव होता. महाराष्ट्र शासनाने धानाला तीन हजार रुपये क्विंटल भाव द्यावे अशी विदर्भातील शेतकऱ्यांची मागणी होती. यावर्षी शेतकऱ्यांच्या धानाला भाव मिळणारच नाही. परिणामी शेतकरी हतबल होईल. तीन वर्षांमध्ये बियाणे, किटकनाशक औषधी, रासायनिक खताच्या उत्पादन खर्चात तीन पटीने वाढ झाली. अशातच धानाला कमी भाव मिळत असल्यामुळे दरवर्षी शेती व्यवसाय तोट्यात येत आहे. कुटुंबाचे पालन पोषण करण्यासाठी शेतकऱ्यांना गायी-बैल व अंगावरील सोन्याचे दागदागिने विकण्याची पाळी आली आहे. याशिवाय राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक, सहकारी सोसायटी, महिला-पुरूष बचत गटाकडून कर्ज काढले आणि धान पिकाची रोवणी केली. परंतु निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या धान पिकाला तलावाचे - नहराचे पाणी मिळाले नाही. याशिवाय निसर्गाने शेतकऱ्यांवर प्रहार करून धान पिकावर खोडकिडा, मावा-तुडतुडा, लष्करी अळी, करपा अशा असंख्य रोगाचा प्रादूर्भाव झाला. रात्रंदिवस मातीत राबणाऱ्या शेतकऱ्याने मोठ्या संघर्षातून निसर्गाशी दोन हात करून शेतीत डौलदार धानपिक उभे केले. काही प्रमाणात धानाची मळणी झाली. एकरी २० ते २५ हजारांचा खर्च करून एक हजार ८०० ते एक हजार ९०० रुपये धानाचा भाव पाहून पुन्हा शेतकरी चिंताग्रस्त व हतबल झाला. आता काय करावे, काय नाही. कर्ज कसे फेडावे, या विवंचनेत या परिसरातील धान उत्पादक शेतकरी सापडला आहे. शासनाने धानाचे हमी भाव वाढवून द्यावे, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. (तालुका प्रतिनिधी)