शेतीचे पाणी सिमेंट उद्योगाला
By Admin | Updated: December 9, 2014 22:47 IST2014-12-09T22:47:49+5:302014-12-09T22:47:49+5:30
कोरपना तालुक्यातील २९६८ हेक्टर शेतीला वरदान ठरणारा पकडीगुड्डम प्रकल्पाची १९९१ ला निर्मीती झाली. मात्र, या प्रकल्पाचे पाणी उद्योगासाठी आरक्षीत करण्यात आल्याने ९५५ हेक्टर शेती पाण्यापासून वंचित आहे.

शेतीचे पाणी सिमेंट उद्योगाला
चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील २९६८ हेक्टर शेतीला वरदान ठरणारा पकडीगुड्डम प्रकल्पाची १९९१ ला निर्मीती झाली. मात्र, या प्रकल्पाचे पाणी उद्योगासाठी आरक्षीत करण्यात आल्याने ९५५ हेक्टर शेती पाण्यापासून वंचित आहे.
कोरपना तालुक्यातील देवघाट नाल्यावर कारगाव बु. या गावाजवळ पकडीगुड्डम प्रकल्प आहे. १९९७ ला या प्रकल्पाच्या कामाला शासनाकडून मंजूरी मिळाली. १९९२ मध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. १९९७ मध्ये प्रकल्पाचे काम पुर्णत: सिंचन प्रकल्प म्हणून पुर्ण झाले. १९९८ पासून शेतकऱ्यांना पाणी सोडण्यात आले. मात्र, याचवेळी या भागात असलेल्या मराठा सिमेंट कंपनीकडून पाण्याची मागणी झाली. त्यानुसार मुख्य अभियंता नागपूर पाटबंधारे विभाग यांच्या ५ मार्च १९९८ च्या पत्रानुसार मराठा सिमेंट कंपनीस प्रतिदीन १.१० दलघमी पाणी वार्षिक आरक्षणास मंजूरी देण्यात आली. त्यानंतर १.१० दलघमी पाण्याच्या मागणीत वाढ होऊन कंपनीने १.९३ दलघमी अतिरीक्त पाण्याची मागणी केली. अंबुजा सिमेंट कंपनीकडून ३.०३ अशी एकून पाण्याची मागणी असल्याने उपयुक्त पाणी साठ्याच्या २५.७२ टक्के पाणी आरक्षण प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला. या प्रस्तावाला २२ जून १९९९ च्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे २५.७२ पाणीसाठा हा उद्योगाला सोडला जात असून ०.५३ दलघमी पाणी हा महाराष्ट्र जीवन प्राधीकरणासाठी आरक्षीत आहे. सिंचनासाठी निर्माण झालेल्या प्रकल्पातून बिगर सिंचनाच्या पाणी आरक्षणामुळे प्रकल्पीय सिंचन क्षमता ९४३ हेक्टरने कपात झाली आहे. परिणामी प्रकल्पाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची निराशा होत आहे. (स्थानिक प्रतिनिधी)