शेतीची केली बोगस फेरफार
By Admin | Updated: August 30, 2015 00:44 IST2015-08-30T00:44:57+5:302015-08-30T00:44:57+5:30
जिवती तालुक्यातील मौजा मरकलमेंढा येथे शेख फकीर अहमद अब्दुल रज्जाक यांची भू.क्र. ७० आराजी २.०० हे आर शेती आहे.

शेतीची केली बोगस फेरफार
पाटण : जिवती तालुक्यातील मौजा मरकलमेंढा येथे शेख फकीर अहमद अब्दुल रज्जाक यांची भू.क्र. ७० आराजी २.०० हे आर शेती आहे. त्यांचा ९ मार्च १९८९ ला मृत्यू झाल्याने वारसान नोंद २६ जून १९९१ ला करण्यात आली. वारसान नोंद करताना मृत्यू दाखला, वारसान दाखला, पोलीस पाटलाचा दाखला, ग्रामसेवकाचा दाखल घेणे बंधनकारक आहे. मात्र या नियमांना डावलून फेरफार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
फेरफारसंबंधीचे पूर्ण दस्ताऐवज तहसीलदार यांच्याकडे जाऊन पंधरा दिवस ते प्रसिद्ध करुन कोणाची तक्रार आहे का, असे प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे. कुणाची तक्रार आली नाही तर ते फेरफार करण्यात येते. परंतु या फेरफारात कोणतेही पुरावे न देता वारसानला सोडून दुसऱ्यांनाच वारसान म्हणून घेण्यात आले. यात फरीद अहमद शेख इब्राहिम, फातिमा बी मिनू खान हे वारसान नसताना वारसान म्हणून कोणतेही पुरावे न घेता वारसान म्हणून नोंद करण्यात आले. फकीर अहमद यांचे वारसान तीन मुली आहेत. इनायत शाहुला शेख, मोहबतनी महबुब शेख, खुशालबी बशीर शेख हे असून यांनी फेरफारसाठी अर्ज केला असता यांना धक्काच बसला. २६ जून १९९१ ला जेव्हा फेरफार करण्यात आले तेव्हा राजुरा तहसील कार्यालय होते. प्रस्तुत प्रतिनिधीने माहिती अधिकारा अंतर्गत अर्ज करुन या प्रकरणाबाबत माहिती मागितली असता जिवती तहसील कार्यालयातून त्यांना माहिती देण्यात आली. त्यात तलाठी रेकॉर्डमध्ये उपरोक्त फेरफारच्या कागदपत्रांची पाहणी केली असता ते आढळले नाही, असे लिखित देण्यात आले. त्यातही शेख फकीर अहेमद अब्दुल रजाक यांचा मृत्यू दाखला ३१ मार्च २०१५ ला काढण्यात आला आहे तर १९९१ ला फेरफार झाले तरी कसे, असा प्रश्न पडला आहे. याबाबत शेख यांनी पोलिसात तक्रार करून तहसीलदार, पटवारी व खोटे वारसान यांच्यावर रितसर कारवाई करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)