वीज कंपनीच्या विरोधात झाडावर चढून आंदोलन
By Admin | Updated: April 24, 2015 00:53 IST2015-04-24T00:53:59+5:302015-04-24T00:53:59+5:30
वीज वितरण कंपनीला वारंवार निवेदन देवूनही वरोरा व भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेजिंग योजना बंद करण्यात आली नाही.

वीज कंपनीच्या विरोधात झाडावर चढून आंदोलन
वरोरा : वीज वितरण कंपनीला वारंवार निवेदन देवूनही वरोरा व भद्रावती तालुक्यातील ग्रामीण भागातील सिंगल फेजिंग योजना बंद करण्यात आली नाही. त्यामुळे थ्री फेजचा पुरवठा होत नसल्याने ग्रामीण भागात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. सिंगल फेजिंग योजना बंद करावी या मागणीसाठी गुरूवारी वरोरा येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर नंदोरी व परिसरातील गावातील नागरिकांनी मोर्चा काढला. नागरिकांनी कार्यालय परिसरातील झाडावर चढुन तब्बल तीन तास अनोखे आंदोलन केले. अखेरीस अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.
सिंगल फेजींग योजना बंद करून थ्री फेज योजना सुरू करावी, याबाबत वारंवार निवेदन देऊन वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या. परंतु त्याचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे गुरूवारी अचानक भाजपचे भद्रावती तालुका महामंत्री नरेंद्र जीवतोडे यांच्या नेतृत्त्वात पुरूष व महिलांनी घागरी घेवून वरोरा येथील वीज वितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता कार्यालय गाठले. अचानक मोर्चेकरी आल्याने प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली. त्यातच वीज वितरण कंपनीच्या आवारत असलेल्या झाडावर नरेंद्र जीवतोडे हे सोबत रॉकेलची बॉटल घेऊन चढले. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही, तोपर्यंत झाडावरुन उतरणार नाही, असा पवित्रा नरेंद्र जीवतोडे यांनी घेतल्याने काही काळ प्रशसनासमोर पेच निर्माण झाला होता.
प्रारंभी उपकार्यकारी अभियंता रमेश नागदेवते, पोलीस निरीक्षक मल्लिकार्जून इंगळे यांनी भाजपा तालुकाध्यक्ष डॉ. भगवान गायकवाड, भाजपा तालुका संघटक ओमप्रकाश मांडवकर, जि.प. सदस्य अर्चना जीवतोडे, पचायत समिती सदस्य वर्षा नन्नावरे, रमेश तिखट, सुधाकर जीवतोडे आदी सोबत चर्चा केली.
परंतु लेखी आश्वसनाशिवाय आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली. वीज वितरण कंपनी वरोराचे प्रभारी कार्यकारी अभियंता काका रामटेके घटनास्थळी दाखल होवून आंदोलकांशी चर्चा केली.
वरोरा व भद्रावती तालुक्यातील गावामधील सिंगल फेजिंग योजना येत्या आठ दिवसांत बंद करण्याबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ तसेच नंदोरी गावातील विद्युत समस्या येत्या आठ दिवसात निकाली काढण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)