पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा
By Admin | Updated: October 1, 2014 23:20 IST2014-10-01T23:20:09+5:302014-10-01T23:20:09+5:30
प्राथमिक शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असने आवश्यक असल्याचे शासनाने गतवर्षी जाहीर केले. मागील वर्षी घेण्यात आलेली टीईटी परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी दिली होती.

पुन्हा शिक्षक पात्रता परीक्षा
बीएड व डीटीएड विद्यार्थ्यांत निरुत्साह : आॅनलाईन अर्ज सादर करण्याला सुरुवात
चंद्रपूर : प्राथमिक शिक्षक पदाकरिता शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असने आवश्यक असल्याचे शासनाने गतवर्षी जाहीर केले. मागील वर्षी घेण्यात आलेली टीईटी परीक्षा हजारो विद्यार्थ्यांनी दिली होती. मात्र, शेकडो डीटीएड व बीएडधारक विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झाले. नव्याने पदवी घेणाऱ्या व गतवर्षीच्या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्यांसाठी यावर्षी १४ डिसेंबरला दुसऱ्यांदा टीईटी परीक्षा घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे, यांनी ३० सप्टेंबर रोजी जाहीरात प्रकाशित केली असून, १ आॅक्टोबरपासून आॅनलाईन अर्ज सादर करण्याला सुरुवात झाली आहे. राज्यात दुसऱ्यांदा शिक्षक पात्रता परीक्षा घेण्यात येत आहे. परीक्षेसाठी १ ते २२ आॅक्टोबरपर्यंत आॅनलाईन अर्ज सादर करायचे असून २७ आॅक्टोबरपर्यंत चलनाव्दारे बँकेत शुल्क भरुन आॅनलाईन अर्ज ट्रान्झेक्शन आयडीसह अपडेट करायचे आहे. आॅनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जाची प्रत ३० आॅक्टोबरपर्यंत तालुका व जिल्हा अर्ज संकलन केंद्रावर सादर करायचे आहे. जिल्ह्यात शेकडो बीएड व डीटीएडधारक विद्यार्थी आहेत. त्यांना नोकरीची प्रतिक्षा असून शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्यास लगेच नोकरी मिळेल, अशी आशाही नाही.
गतवर्षीच्या परीक्षेत जिल्ह्यातील १२ हजारच्या जवळपास उमेदवारांनी शिक्षक पात्रता परीक्षा दिली होती. मात्र, यातील केवळ एक हजारच्या जवळपास उमेदवार उत्तीर्ण झाले होते. अनेक विद्यार्थ्यांनी परीक्षेत विचारलेल्या प्रश्नांवर आक्षेप नोंदविला होता. तर काही जिल्ह्यात टीईटी परीक्षा रद्द करण्याची मागणी झाली. मात्र, राज्य परीक्षा परिषदेने ही परीक्षा घेतली. जे उमेदवार परीक्षा उत्तीर्ण झाले त्यांना शिक्षक पात्रतेचे प्रमाणपत्र मिळाले आहे. मात्र, राज्यात शिक्षक भरतीच होत नसल्याने त्यांच्या जवळील प्रमाणपत्र कुचकामी ठरत आहे. आता दुसऱ्यांदा ही परीक्षा होत असल्याने डीटीएड व बीएडधारक उमेदवारांत परीक्षेविषयी फारसा उत्साह दिसून येत नाही. (स्थानिक प्रतिनिधी)