२५ लाखांचा कर भरल्यानंतर सील हटविले

By Admin | Updated: August 14, 2016 00:35 IST2016-08-14T00:35:57+5:302016-08-14T00:35:57+5:30

येथील मुख्य मार्गावर असलेल्या जयंत चित्रपटगृहाकडे मागील वर्षापासून २५ लाख रुपयांचा करमणूक कर थकीत होता.

After tax payment of 25 lakhs, the seal is deleted | २५ लाखांचा कर भरल्यानंतर सील हटविले

२५ लाखांचा कर भरल्यानंतर सील हटविले

चित्रपटगृहावरील कारवाई : एका वर्षांपासून होता करमणूक कर थकीत
चंद्रपूर : येथील मुख्य मार्गावर असलेल्या जयंत चित्रपटगृहाकडे मागील वर्षापासून २५ लाख रुपयांचा करमणूक कर थकीत होता. वारंवार सूचना देऊनही कर न भरल्याने करमणूक कर विभागाने जयंत टॉकीजवर शुक्रवारी कारवाई करीत बॉक्स आॅफीसला सील ठोकले. त्यामुळे या चित्रपटगृहातील रात्रीचा शो होऊ शकला नाही. आज शनिवारी सकाळी २५ लाख रुपयांचा कर भरल्यानंतर चित्रपटगृह चालविण्याची परवानगी देण्यात आली. अप्पर जिल्हाधिकारी संजय धिवरे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून शुक्रवारी रात्री परवाना रद्द करीत असल्याचे आदेशपत्र टॉकीजच्या भिंतीवर लावण्यात आले होते.
सिनेमागृह व्यवस्थापनाने जिल्हाधिकारी कार्यालयातील कमरणूक कर विभागाकडे नियमित करमणूक कर भरणे आवश्यक असताना टॉकीज व्यवस्थापनाने मार्च २०१५ पासून करमणूक करच भरला नाही. दोन वेळा नोटीस बजावूनही जयंत टॉकीज व्यवस्थापनाने करमणूक कर न भरल्याने जानेवारी २०१६ मध्ये कर विभागाचे अधिकारी कारवाई करण्यासाठी जयंत टॉकीजमध्ये गेले होते. त्यानंतर चित्रपटगृहाचे संचालक जयंत मामीडवार याविरोधात न्यायालयात गेले. न्यायालयाला त्यांनी मार्च २०१६ पर्यंत पैसे भरण्याचे आश्वासन दिले होते. मात्र या कालावधीत त्यांनी केवळ सहा लाख रुपयेच कर भरला. उर्वरित कर थकीतच होता.
त्यानंतर शुक्रवारी रात्री करमणूक कर विभागातील अधिकारी जयंत टॉकीजमध्ये पोहोचले व बॉक्स आॅफीसला सील ठोकले. सर्व तिकिटाही ताब्यात घेतल्या. त्यामुळे रात्री ९.३० वाजताचा शो रद्द करावा लागला. ही कारवाई करताना तहसीलदार आशिष वानखेडे, आयएएस अधिकारी अमन मित्तल उपस्थित होते.
या संदर्भात सहायक करमणूक अधिकारी विलास वानखेडे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या कारवाईची पुष्टी केली. रात्री ९.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, शनिवारी टॉकीजच्या मालकांनी २५ लाख रुपये कर भरल्यानंतर सील हटविण्यात आले. त्यामुळे शनिवारी दुपारी १२ वाजताचा शो सुरू झाला. (शहर प्रतिनिधी)

Web Title: After tax payment of 25 lakhs, the seal is deleted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.