अखेर बाटली फुटली
By Admin | Updated: March 31, 2015 01:00 IST2015-03-31T01:00:58+5:302015-03-31T01:00:58+5:30
राज्य शासनाने घेतलेल्या दारूबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अवघे काही तास उरले आहे. पोलीस यंत्रणा

अखेर बाटली फुटली
दारू दुकानात मद्यपींच्या उड्या : काही तासानंतर दारूविक्री होणार बंद
चंद्रपूर : राज्य शासनाने घेतलेल्या दारूबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी अवघे काही तास उरले आहे. पोलीस यंत्रणा सज्ज झाली असून मंगळवारी रात्री १२ वाजतानंतर दारूविक्री बंद होणार आहे. त्यामुळे दारूविक्रेते व मद्यपी अस्वस्थ झाले आहेत. यापुढे दारू मिळणार नाही म्हणून अनेक मद्यपी दारूदुकानांत उड्या मारत असून जिल्ह्यात ‘थर्टी फर्स्ट’चा माहोल निर्माण झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी करण्याचा निर्णय शासनाने घेताच दारूविक्री बंदीचे काऊंटडाऊन सुरू झाले. महिनाभरापासूनच विक्रेत्यांनी नवीन दारूसाठा आणणे बंद केले होते. अशातही न्यायालयातील याचिकेवर अपेक्षा होत्या. मात्र त्यातही अपयश आल्याने दम्यविक्रेते आणि मद्यशौकिनांची लॉबी हतबल झाली आहे. १ एप्रिलनंतर दारू दुकांनांमधील दारूचा साठा तपासला जाणार असल्याने दुकानात आहे तेवढी दारू संपविण्याकडे अनेक दुकानमालकांचा कल आहे. अशातही मागणी अधिक असल्याने शिल्लक असलेला दारूसाठा जादा दराने विकणे सुरू आहे. मात्र अनेक मद्यपी किमतीचा विचार न करता आपली हौस पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.
राज्य शासनाच्या निर्णयाची १ एप्रिलपासून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी पोलिसांनी प्रभावी योजना आखल्या आहेत. दारूबंदीनंतर अवैध मार्गानेही आपल्याला दारू मिळणार नाही, अशी मानसिकता अनेक मद्यपींची झाली आहे.
दारूबंदीनंतरच्या स्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने योजना आखल्या आहे. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी मंगळवारी बैठकीचे आयोजनही केले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
१ एप्रिलनंतरच्या कारवाईच्या भीतीने मद्यविक्रेत्यांनी साठा संपविण्याकडे लक्ष केंद्रीत केलेआहे.महिनाभरापासूनच याची दक्षता घेतली होती. मद्यविक्री बंद झाल्यानंतर अनेकांनी नवा रोजगार शोधण्याचा प्रयत्न केला आहे. बाहेरच्या युवकांनी परत जाण्याची तयारी केली आहे.
येत्या दिवसात काही नवा मार्ग निघतो काय याची चाचपणीही मद्य विक्रेत्यांकडून केली जात आहे. व्यवसायासाठी नवी ठिकाणे शोधली जात आहेत.
दारूबंदीची अंमलबजावणी करण्यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. त्यासाठी आजच सर्व ठाणेदारांना दारूबंदी अंमलबजावणीच्या विषयात सूचना दिल्या आहेत. पोलीस ठाण्याच्या स्तरावर विशेष पथकेही तयार केली आहेत. यासोबतच यापूर्वी दारू व्यवसाय करणाऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात येणार आहे. शासनाच्या निर्णयाचे सर्वतोपरी पालन करण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. नागरिकांनीही कायद्याचा सन्मान राखून सहकार्य करणे अपेक्षित आहे.
- डॉ. राजीव जैन
जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर
मद्यसम्राट अस्वस्थ
गेल्या कित्येक वर्षांपासून दारूविक्रीचा व्यवसाय करून गब्बर झालेले मद्यसम्राट दारूबंदीच्या निर्णयाने अस्वस्थ झाले आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दारूबंदीवर निर्णय राखून ठेवला होता. सोमवारी न्यायालयाने दारूबंदी कायम ठेवण्याचा निर्णय दिला. त्यामुळे मद्यसम्राटात अस्वस्थता पसरली. न्यायालयाचा निर्णय जाहीर होण्यापूर्वी उत्सुकता लागलेले दारूविक्रेते एकमेकांना फोन करून निर्णयाचा कानोसा घेत होते. मात्र निर्णय कानावर पडताच या सर्वांचीच घोर निराशा झाली.
थर्टी फर्स्टचा माहौल
अवघे काही तास उरल्याने जिल्ह्यात अनेक ठिकाणी थर्टी फर्स्टसारखे चित्र दिसत आहे. जिल्ह्यात खुलेआमपणाने दारू पिण्याची ही अखेरची संधी असल्याने रांगा लावून दारू खरेदी सुरू असल्याने अनेक ठिकाणी चित्र आहे. जमेल तसा स्टॉक सुरक्षितपणे बाळगण्याकडेलही अनेक मद्यशौकिनांचा कल दिसला. गेल्या दोनतीन दिवसांपासून मित्रमंडळींच्या पार्ट्या रंगत असून ही अखेरची संधी घ्यायला सारेच आतूर आहेत.