अखेर ‘त्या’ बालकाचे छत्र हरपले
By Admin | Updated: September 21, 2014 23:47 IST2014-09-21T23:47:51+5:302014-09-21T23:47:51+5:30
तीन महिन्यांच्या आपल्या मुलाला दवाखान्यात उपचार करून गावाकडे परत नेत असताना राजुरा-गडचांदूर मार्गावर दुचाकीला अपघात झाला. यात वडिलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर,

अखेर ‘त्या’ बालकाचे छत्र हरपले
सास्ती : तीन महिन्यांच्या आपल्या मुलाला दवाखान्यात उपचार करून गावाकडे परत नेत असताना राजुरा-गडचांदूर मार्गावर दुचाकीला अपघात झाला. यात वडिलाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर, आई मृत्यूशी झुंज देत नागपूर येथे उपचार घेत होती. रविवारी उपचारादरम्यान तिचाही मृत्यू झाला. यामुळे तीन महिन्याच्या मुलाचे छत्र हरपले असून त्याची जबाबदारी आता वयोवृद्ध आजी-आजोबांवर आली आहे.
पांढरपौनी येथील संतोष उद्धव लांडे व सुषमा संतोष लांडे हे दाम्पत्य त्यांच्या तीन महिन्याच्या क्षितिजला उपचारासाठी राजुरा येथे आणले होते. उपचार आटोपून पांढरपौनी गावाला परत जाण्यास निघाले. परंतु राजुऱ्यापासून अवघ्या दोन किमी अंतरावरील कापनगाव येथील पेट्रोलपंपाजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने धडक दिली आणि वाहनचालक वाहनासह पळून गेला. तेथे असलेल्या नागरिकांनी तिघांनाही रुग्णालयात आणले. परंतु डॉक्टरांनी संतोषला मृत घोषित केले. तर पत्नी सुष्मावर उपचार सुरु केले. त्यांच्यासोबत असलेला तीन महिण्याचा क्षितिज जखमी झाला.
दरम्यान, सुषमाची प्रकृती गंभीर असल्याने तिला प्रथम चंद्रपूर व नंतर नागपूर येथे दाखल करण्यात आले. परंतु रविवारी दुपारी सुष्माचाही मृत्यू झाला. आई-वडिलांच्या मृत्यूमुळे तीन महिण्याच्या बालकाचे छत्र हरपले. त्याचा सांभाळ वृद्ध आजीआजोबाला करण्याची वेळ आली आहे. (वार्ताहर)