अखेर ‘त्या’ कुत्र्याचे शवविच्छेदन
By Admin | Updated: April 18, 2015 01:14 IST2015-04-18T01:14:12+5:302015-04-18T01:14:12+5:30
चंद्रपूर शहरात शुक्रवारी शहर पोलिसांना एका महिला साहित्यिकेच्या कुत्र्याचे शवविच्छेदन करावे लागले.

अखेर ‘त्या’ कुत्र्याचे शवविच्छेदन
चंद्रपूर: चंद्रपूर शहरात शुक्रवारी शहर पोलिसांना एका महिला साहित्यिकेच्या कुत्र्याचे शवविच्छेदन करावे लागले. सदर कुत्र्याचा गुरुवारी दुपारी संशयास्पद मृत्यू झाल्याची तक्रार शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली. मात्र यासंदर्भात कारवाई करण्यासाठी पोलिसांनी हात वर केले. मात्र प्रकरण जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या दालनात पोहचल्यानंतर शहर पोलिसांना त्या मृत कुत्र्याचे शवविच्छेदन करावे लागले.
स्थानिक कारागृह परिसरात निर्मला चांदेकर ऊर्फ नीर शबनम (७०) या वयोवृद्ध महिला वास्तव्याला आहेत. चंद्रपुरातील जनता महाविद्यालयात त्या प्राचार्यपदीही कार्यरत होत्या. त्यांनी आजवर अनेक पुस्तके लिहीली असून त्यांना महाराष्ट्र हिंदी साहित्य अकादमी पुरस्कारही प्राप्त आहे.
सेवानिवृत्तीनंतर त्या स्थानिक कारागृह मार्गावर स्वत:च्या जुन्या घरात एकट्या वास्तव्याला आहेत. त्यामुळे त्यांनी घरात अनेक कुत्रे पाळले आहेत. काही लोक त्यांची जागा हडपण्यासाठी त्यांच्या कुत्र्यांना ठार मारत असल्याचा त्यांचा आरोप आहे. यासंदर्भात त्यांनी यापूर्वी पोलीस ठाण्यात ्रतक्रारीही नोंदविल्या आहेत. गुरूवारी दुपारी त्यांपैकी एक कुत्रा अचानक मरण पावला. यासंदर्भात त्यांनी शहर पोलिसांसोबत संपर्क साधून कुत्र्याचे शवविच्छेदन करण्याची मागणी केली. मात्र ठाणेदार प्रदीप सिरस्कर यांनी यासाठी नकार दिला. मात्र निर्मला चांदेकर यांनी याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. राजीव जैन यांच्याकडे तक्रार केली. जैन यांनी यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश सिरस्कर यांना दिल्यानंतर स्थानिक पशु चिकीत्सालयात मृत कुत्र्याचे शवविच्छेदन करण्यात आले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर कारवाई केली जाणार आहे. (प्रतिनिधी)