४८ तासांनंतर साळींदर प्राण्याची लावली विल्हेवाट
By Admin | Updated: September 15, 2016 00:52 IST2016-09-15T00:52:05+5:302016-09-15T00:52:05+5:30
वाहनाच्या धडकेत साळींदर प्राण्याचा मृत्यू झाला.

४८ तासांनंतर साळींदर प्राण्याची लावली विल्हेवाट
वरोरा येथील प्रकार : वनविभागाचे अधिकारी झाले जागे
वरोरा : वाहनाच्या धडकेत साळींदर प्राण्याचा मृत्यू झाला. याची माहिती वरोरा वनविभागास एका अज्ञात व्यक्तीने दिल्यानंतरही मृत साळींदर प्राण्याची विल्हेवाट लावण्याची तसदी घेतली नाही. २४ तासांचा कालावधी लोटल्यानंतर मृत साळींदरला रस्त्याच्या कडेला फेकून देण्यात आले. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रकाशित होताच तब्बल ४८ तासानंतर त्या मृत साळींदर प्राण्याला वनविभागाच्या वतीने जमिनीत पुरण्यात आले.
नागपूर-चंद्रपूर मार्गावरील आनंदवन चौकानजीकच्या पेट्रोल पंपासमोर एक साळींदर प्राणी मृत पावले होते. परंतु २४ तासाचा कालावधी लोटुनही स्थानिक वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्याची विल्हेवाट लावली नाही. वन्यप्राण्याच्या वर्गवारी दोन मध्ये साळींदर प्राण्याचा समावेश असताना वनविभागाने निष्काळजीपणाने मृत साळींदरला रस्त्याच्या कडेला फेकुन दिले होते.
याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, कुणी पक्षी तर कुणी अधिकाऱ्यांनी त्याची नियमानुसार विल्हेवाट लावल्याची माहिती लोकमतला दिली होती.
याबाबत बुधवारी वृत्त प्रकाशित होताच वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ तातडीने शोधून रस्त्याच्या कडेला फेकलेल्या मृत साळींदर प्राण्याला जमिनीमध्ये पुरून त्याची विल्हेवाट लावली. त्यामुळे वनविभाग किती दक्ष राहतो, याचा चांगलाच प्रत्यय या प्रकरणावरून नागरिकांना दिसून आला आहे. (तालुका प्रतिनिधी)
वरिष्ठांच्या दौऱ्याने वाचा फुटली
वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी वरोरा येथील दौऱ्यावर येणार आहे. साळींदर प्राणी जिथे मृत पावला त्या परिसरात वरिष्ठ वनाधिकारी थांबणार असल्याची चाहुल वनाधिकारी व कर्मचाऱ्यांना लागली. त्यामुळे त्यांनी मृत साळींदर प्राण्याला रस्त्याच्या कडेला फेकून विल्हेवाट लावली. यामुळेच या प्रकरणाला वाचा फुटल्याचे मानले जात आहे.