१५ वर्षांनंतरही दुर्गापूर बायपास रिंगरोडला पूर्णत्वाची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2016 00:36 IST2016-04-16T00:36:43+5:302016-04-16T00:36:43+5:30
शहरावर पडणारा वाहतुकीचा भार कमी व्हावा आणि जड वाहतूक शहराबाहेरून वळविली जावी यासाठी आराखड्यात नवे बायपास मार्ग आखले असले ....

१५ वर्षांनंतरही दुर्गापूर बायपास रिंगरोडला पूर्णत्वाची प्रतीक्षा
शहरावर पडतोय ताण : विकासाला बसली खीळ
चंद्रपूर : शहरावर पडणारा वाहतुकीचा भार कमी व्हावा आणि जड वाहतूक शहराबाहेरून वळविली जावी यासाठी आराखड्यात नवे बायपास मार्ग आखले असले तरी दुर्गापूर-तुकूम बायपास मार्गला १५ वर्षांतरही पूर्णत्वाची प्रतीक्षा आहे. २००० मध्ये हा मार्ग आराखड्यात समाविष्ठ होऊनही प्रत्यक्षात मार्ग अस्तित्वात आणण्यासाठी शासकीय यंत्रणा उदासिन दिसत आहे, यामुळे चंद्रपूर शहरावरील वाहतुकीचा भार मात्र सतत वाढतच आहे.
वरोरा नाका उड्डाण पूल अस्तित्वात येताना या बायपास मार्गाच्या निर्मीतीचा मुद्दा चर्चेत आला होता. मात्र प्रशानसाच्या रेट्यापुढे ही चर्चा मागे पडली. त्यामुळे नकाशावर असणारा हा मार्ग प्रत्यक्षात अस्तित्वात केव्हा येणार, याचा अंदाज कुणालाही नाही. कुंदन प्लाझा ते तुकूम आणि पुढे बंगाली कँपजवळील मूल मार्गाला जावून मिळणारा हा दुर्गापूर-तुकूम बायपास मार्ग आखण्यात आला आहे. सुमारे तीन किलोमीटर लांबीच्या या मार्गात अलिकडे अतिक्रमणाचा अडथळा वाढला आहे.
कुंदन प्लाझा चौकातून निघणारा हा ६० मिटर रूंदीचा बायपासमार्ग तुकूममधून पुढे विधी महाविद्यालासमोरून निघतो. मात्र कुंदन प्लाझा ते विधी महाविद्यालयापर्यंतच्या तीन किलोमीटर मार्गावर या प्रस्तावित मार्गाच्या अस्तित्वाच्या खाणाखुणा कुठेच दिसत नाहीत. दरम्यानच्या या मार्गावर सुमारे १० ते १५ पक्की घरेही उभी झाली आहेत. त्यांना प्रशासनाने मंजुरी कशी दिली आणि ती कोणत्या आधारावर बांधली गेली, हे सुद्धा एक कोडेच आहे.
या परिसरात सुमारे १०० एकर अकृषक जमीन आहे. जमिनमालकांनी प्लॉट पाडून विकण्याचा प्रयत्न करूनही कुणी ग्राहकच फिरकत नाही. कारण, या भागाला जोडणारा अॅप्रोच मार्गच अस्तित्वात नाही. अशाही स्थितीत सुमारे २०० घरे या भागात उभी झाली आहेत.
मात्र त्यांच्यासाठी रस्ता नसल्याने रेल्वे रूळ ओलांडून धोकादायक स्थितीत या नागरिकांना ये-जा करावी लागते. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.
शहराच्या वाढीला या परिसरात वाव असूनही केवळ मार्ग नसल्याने या परिसरातील भूखंड ओस पडले आहेत. सात ते आठ ले-आऊटधारक या परिसरात आहेत. मात्र अत्यल्प दर ठेवूनही ग्राहक प्रतिसाद देत नाहीत. रेल्वे रूळाच्या अलिकडे दीड ते दोन हजार रूपये चौरस फुट दर आणि पलिकडे मात्र दोनशे ते अडिचशे रूपये दर अशी स्थिती आहे.
हा मार्ग अस्त्विात आला तर वरोरा नाका चौकातून नागपूर-बल्लारपूर मार्गावरून जाणारी जड वाहतूक या बायपास रिंग रोडने वळविणे शक्य आहे. या मार्गवरील वाहतुकाचा भार आणि चौकात घडलेले ५४ अपघात लक्षात घेवून उड्डाण पूल बांधण्यात आला, मात्र हा पूल केवळ एकपदरी असल्याने तोडगा निघाला असे म्हणता येणार नाही. शहराच्या विकासात भर घालू शकणारा हा बायपास मार्र्ग अस्तित्वात कधी येणार याकडे अनेकांच्या नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)