वनविभागातील अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: December 12, 2015 03:39 IST2015-12-12T03:39:57+5:302015-12-12T03:39:57+5:30
वनविभागाच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर

वनविभागातील अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत
कुटुंबाची वाताहत : १५ वर्षांपासून नोकरीसाठी सुरू आहे संघर्ष
कोठारी : वनविभागाच्या सेवेत कार्यरत असताना मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील एका सदस्यास अनुकंपा तत्वावर नोकरीत सामावून घेण्याची तरतूद राज्य शासनाकडे आहे. मात्र मागील १५ वर्षापासून अनुकंपाधारक नोकरीच्या प्रतीक्षेत ताटकळत आहेत. नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात अनुकंपाधारकाच्या समायोजनावर निर्णय घेण्याची मागणी सुनील बोनगिरवार व अनुकंपाधारकांनी वनमंत्र्यांकडे केली आहे.
अनुकंपाधारकांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात ठेवली जात होती. त्यामध्ये जिल्ह्यातील उमेदवारांचा समावेश असल्यामुळे अनुकंपाधारकांना नोकरीत संधी मिळण्यासाठी पाच ते दहा वर्षाचा कार्यकाळ लागत असल्याने शासनाने नियुक्ती करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले. मात्र त्यातही अनुकंपाधारकांची फरफट आजपर्यंत सुरु आहे. शासनाने अनुकंपाधारकांना नोकरीत घेण्यासाठी पाच टक्के कोटा करुन त्यात सेवानिवृत्त अथवा मुत्यूने रिक्त होणाऱ्या पदासाठी ठेवला. त्यात सुधारणा करुन पाच टक्यावरुन आता १० टक्के कोटा निर्धारित करण्यात आला.
सध्या अनुकंपाधारक अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत अतिदुर्गम भागात जीवन जगत आहेत. २००० पासून एकही अनुकंपाधारकास नोकरीवर घेण्यात आले नाही. कुटुंबाचा गाडा हाकताना त्याची मोठी कसरत होत आहे. मोलमजुरी करुन कुटुंबाची उदरनिर्वाहाची समस्या दूर करण्याचा प्रयत्न होत असताना मनात केवळ एकच आशा ‘आज नाहीतर उद्या नोकरीची संधी मिळणार व कुटुंबाची होणारी वाताहत थांबणार’ असते. मात्र १५ वर्ष लोटून गेले तरी नोकरी न मिळाल्याने मनात निराशा असून जीवन मरणाचा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.
शासनाने २०१४ ला नवा अध्यादेश काढून वनरक्षक पदासाठी विज्ञानात बारावी उत्तीर्ण पात्रतेची अट घातली. ती अट अनुकंपाधारकांसाठी लावण्यात आली. मात्र वनविभागात कार्यरत कर्मचारी ग्रामीण भागात व अतिदुर्गम भागात असल्याने ते आपल्या पाल्यांना विज्ञान शाखेतून शिक्षण देवू शकले नाही. अशात अनुकंपाधारकावर वरील अट अन्यायकारक ठरत आहे. नोकरीचा मार्ग बंद करण्यात आला आहे. वनविभागात लिपीक, वनरक्षक ही क गट संवर्गातील व चौकीदार, शिपाई, माळी संवर्गातील पदे अत्यंत कमी आहेत. दरवर्षी रिक्त होणाऱ्या पदावर १० टक्के पदे एक किंवा दोन असतात. तेव्हा १५० अनुकंपाधारकांना नोकरीवर संधी मिळविण्यासाठी २० ते २५ वर्ष लागू शकतात. तोपर्यंत त्याची वयोमर्यादा पार झाली असणार. अशावेळी नोकरीवर संधी मिळणे धूसर होणार आहे.
अनुकंपाधारकांना सरळसेवेत प्राधान्य देण्यात यावे. वनरक्षक भरतीसाठी १२ वी विज्ञान शाखेची अट शिथिल करण्यात यावी व अनुकंपाधारकांना नोकरीत संधी देण्याची कार्यवाही त्वरित सुरू करावी, अशी मागणी सुनिल बोनगिरवार यांच्यासह अनुकंपाधारकांनी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे. अनुकंपाधारकांना शासनाने नोकरीत सामावून घेण्यासाठी कार्यवाही करण्यापेक्षा त्यांना दूर करण्याकडे लक्ष केंद्रीत करीत आहे. नवनवीन अटी निर्माण करुन अन्याय करीत आहे. यामुळे अनुकंपाधारकांत तीव्र संताप पसरला असून निराशा पसरल्याने त्यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे सुनिल बोनगिरवार यांनी म्हटले आहे.