नागभीड नगर परिषदेसाठी वकील डॉक्टर, प्राध्यापक इच्छुक
By Admin | Updated: March 12, 2017 01:35 IST2017-03-12T01:35:02+5:302017-03-12T01:35:02+5:30
नागभीड नगरपरिषदेचा राजकीय आखाडा तापायला सुरुवात झाली आहे. या आखाड्यात नागभीड येथील वकील,

नागभीड नगर परिषदेसाठी वकील डॉक्टर, प्राध्यापक इच्छुक
जनसंपर्क वाढविण्याचा प्रयत्न : राजकीय पक्षांची मोर्चेबांधणी सुरू
घनश्याम नवघडे नागभीड
नागभीड नगरपरिषदेचा राजकीय आखाडा तापायला सुरुवात झाली आहे. या आखाड्यात नागभीड येथील वकील, डॉक्टर, प्राध्यापकांसोबतच राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गज रिंगणात उतरत असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत.
नागभीड नगरपरिषदेची ही पहिलीची निवडणूक आहे. त्यामुळे प्रत्येकालाच नवलाई आहे. मिळालेल्या संकेताप्रमाणे या नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. १ मधून काँग्रेसचे जेष्ठ नेते पंजाबराव गावंडे यांचे चिरंजीव व नागभीड पं.स.चे माजी उपसभापती दिनेश गावंडे यांनी लढण्याची तयारी चालविली आहे. भाजप येथून कोणाला उमेदवारी देते हे गुलदस्त्यात असले तरी डोंगरगावचे रामदास हेमणे येथून दावा करू शकतात. येथील दुसरे पद अनु.जातीच्या महिलेकरिता आरक्षित आहे. त्यामुळे राजकीय पक्षांना शोधमोहीम राबवावी लागणार आहे. बोथली-चिखलपरसोडी व पंचायत समिती कृषीनगर भाग मिळून तयार करण्यात आलेल्या प्रभाग क्र. २ मधून काँग्रेसकडून चिखलपरसोडीचे माजी सरपंच पुरुषोत्तम राऊत, दीपक ब्राम्हणकर यांनी दावा केला आहे. भाजपकडून चिखलपरसोडीचे माजी उपसरपंच गौतम राऊत, सुलेझरीचे माजी सरपंच सचिन आकुलकर यांच्या नावाची येथे चर्चा आहे. चिखलपरसोडीचे माजी उपसरपंच दिनकर संदोकर यांनी येथून अपक्ष लढण्याची तयारी केली आहे.
जुन्या नवखळा वस्तीचा समावेश असलेल्या प्रभाग क्र. ३ मधून काँग्रेसकडून निवृत्त प्राचार्य बारेकर इच्छुक आहेत. भाजपाकडून येथे दिलीप चौधरी उमेदवार बनू शकतात. महिला प्रवर्गातून येथून दोन्ही पक्ष कोणास मैदानात उतरवतात हे अद्याप गुलदस्त्यात आहे. प्रभाग क्र. ४ मधून शिरिष वानखेडे यांनी काँग्रेसकडून काम सुरू केले आहे. येथील दुसरे पद अनु.जमाती महिलाकरिता राखीव आहे. पुष्पा चौखे किंवा धारणे येथून काँग्रेसच्या उमेदवार होऊ शकतात. भाजपकडून येथून अॅड. रविंद्र चौधरी यांनी होर्डिंग्ज बॅनरच्या माध्यमातून संपर्कास सुरुवात केली आहे. याशिवाय मनोज कोहाड, राजेश मेश्राम यांच्या नावाचीही चर्चा ऐकायला मिळत आहे.
नागभीडचे नगराध्यक्षपद अनु.जमातीकरिता आरक्षित आहे. असे असले तरी केवळ माना जातीच्या उमेदवारांवर काँग्रेस व भाजपा या दोन्ही पक्षाचे विचारमंथन सुरू असल्याचे दिसून येत आहे. भाजपकडून प्रा.डॉ. उमाजी हिरे, नाना चौखे, विलास श्रीरामे यांनी पोस्टर-बॅनरद्वारे प्रचारास प्रारंभ केला आहे. काँग्रेसकडून विनायक रंघये, विनायक चौखे, प्रमोद जुमनाके यांची नावे घेतली जात आहेत.
नागभीड नगर परिषदेची मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादीवर काही आक्षेप किंवा हरकती असतील तर १६ मार्चपर्यंत त्या दाखल कराव्यात, असे प्रशासनाने म्हटले आहे.
नागपूरला दोन टर्म नगरसेवक राहिलेले प्राचार्य योगेश गोन्नाडे यांनी स्वत: नगराध्यक्ष म्हणून तिसऱ्या आघाडीमार्फत निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक प्रभागातून उमेदवार तेसुद्धा देणार आहेत. त्यामुळे काँग्रेस-भाजपाकडून उमेदवारी न मिळालेले इच्छुक तिसऱ्या आघाडीकडून रिंगणात उतरू शकतात.