घरकामासह ‘त्या’ देतात प्रशासकीय सेवा

By Admin | Updated: March 13, 2016 00:57 IST2016-03-13T00:57:08+5:302016-03-13T00:57:08+5:30

देशात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने महिलांकडे चूल आणि मूल सांभाळणारी एक सेविका अशाच भावनेने आजही समाज पाहतो.

The administrative service that offers 'those' with homeowners | घरकामासह ‘त्या’ देतात प्रशासकीय सेवा

घरकामासह ‘त्या’ देतात प्रशासकीय सेवा

६२ महिला सांभाळतात गावाचा कारभार : २३ महिला बनल्या गावच्या ‘पाटलीण’
राजकुमार चुनारकर खडसंगी
देशात पुरुषप्रधान संस्कृती असल्याने महिलांकडे चूल आणि मूल सांभाळणारी एक सेविका अशाच भावनेने आजही समाज पाहतो. मात्र बदलत्या काळानुसार पुरूषप्रधान संकल्पनेवर मात देत महिला आता प्रत्येक क्षेत्रात अग्रणी आहेत हे दिसून येते. चिमूर तालुक्यात ६२ महिला गावाचा कारभार सांभाळत राजकारणात आहेत, तर हजारो महिला शासनाच्या विविध विभागात घरकामासह प्रशासकीय सेवा देत आहेत.
पुरातन काळात स्त्रियांना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्यात येत होते. स्त्रियांना एक भोगवस्तू म्हणूनच पाहिल्या जात होते. मात्र इंग्रज राजवटीत महात्मा फुले, सावित्रीबाई फुले तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानिक अधिकार देऊन महिलांचा सन्मान वाढविला. आजच्या घडीला महिला प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असल्या तरी पुरुषांपेक्षा त्यांचे प्रमाण कमी आहे.
महिलांना राजकारणासह प्रशासकीय नोकरीमध्ये आरक्षण असल्याने अनेक महिला विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र पुरुषी मानसिकतेमुळे मोठ्या प्रमाणात आजही महिला चुल आणि मुल सांभाळण्यातच धन्यता मानत आहेत. पंचायत राज व्यवस्थेत तत्कालीन काँग्रेस सरकारने महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण दिल्याने अनेक महिला जिल्हा, तालुक्यासह गावाचा कारभार सांभाळण्यासाठी सत्तेमध्ये सहभागी झाल्या आहेत. चिमूर शहरासह तालुक्यातील ४२ ग्रामपंचायतीचा कारभार महिला सांभाळत आहेत, तर जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेसह ६२ महिला राजकारणात कार्य करित आहेत.
भारताच्या संविधानाने दिलेल्या अधिकारामुळे प्रधानमंत्री, राष्ट्रीय या मोठ्या पदासह अंतराळातही महिलांनी भरारी घेतली आहे. देशाच्या राजकारणासह गावाच्या कारभारापर्यंत सहभागी झाल्या आहेत. एकेकाळी महिलांना पडद्याच्या मागे राहावे लागत होते. मात्र आता अनेक महिला गावाच्या कारभारासह गावातील न्यायनिवाडे करण्यातही आपला सहभाग देत आहेत. त्यामुळे महिलांचा राजकारणासह प्रशासनातही सहभाग वाढल्याने आजची नारी अबला नसुन सबला झाल्याची प्रचिती या महिलाच्या सहभागावरून दिसत आहे. तेव्हा महिलाही पुरुषांपेक्षा कोणत्याच क्षेत्रात मागे नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. चिमूर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १६१ शाळामध्ये १६१ शिक्षिका कार्यरत आहेत तर तीन महिला केंद्र प्रमुख म्हणून कार्यरत आहेत तर आरोग्य विभागात १९४ आशावर्कर, ३१ परिचारिका, ६ सुपरवायजर, १८ कंत्राटी अशा २५९ महिला तालुक्यातील नागरिकांना आरोग्यसेवा देत आहेत. तसेच राज्य परिवहन महामंडळामध्ये १९ वाहक, ६ यांत्रिकी अशा २५ महिला हातात मशीन व पाने पेंचिस घेऊन कार्यरत आहेत. तसेच ५ महिला तालुक्याच्या सुरक्षा व्यवस्थेतही सहभागी झाल्या आहेत. तसेच समाजाचे लहान मूल घडवण्याकरिता २७७ अंगणवाडीतून एकात्मिक बाल विकास प्रकल्पातर्फे ५७४ महिला सेवा देत आहेत. अशाप्रकारे १०३८ महिला राजकारणासह प्रशासनाच्या सेवेतही चूल आणि मूल सांभाळत आपली सेवा देत आहेत. तालुक्यात झालेल्या पोलीस पाटील भरतीमध्ये २३ महिला गावाच्या ‘पाटलीण’ बनल्या आहेत. त्यामुळे घरकामासह महिला आजघडीला प्रशासकीय सेवेतही पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करित आहेत.

Web Title: The administrative service that offers 'those' with homeowners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.