ब्रह्मपुरीच्या शिवाजी चौकातील कॉम्पलेक्सला प्रशासनाची नोटीस
By Admin | Updated: August 7, 2015 00:05 IST2015-08-07T00:05:48+5:302015-08-07T00:05:48+5:30
शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकातील कॉम्प्लेक्स मालकांना अवैध बांधकाम प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

ब्रह्मपुरीच्या शिवाजी चौकातील कॉम्पलेक्सला प्रशासनाची नोटीस
अशोक भैय्या यांची मागणी : अनाधिकृत बांधकामधारकांवर कारवाई व्हावी
ब्रह्मपुरी : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शिवाजी चौकातील कॉम्प्लेक्स मालकांना अवैध बांधकाम प्रकरणी नगरपरिषद प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यामुळे हे कॉम्प्लेक्स पुन्हा वादाच्या भोवऱ्यात गडद होत गेले आहे. या अनाधिकृत कॉम्प्लेक्सबाबत विद्यमान उपाध्यक्ष अशोक भैय्या यांनी विशेष सभा बोलवून कार्यवाही करण्याची मागणी केली असून सदर प्रकरणाला फौजदारी वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियम १९६५ चे कलम ५३ चे तरतूदी प्रमाणे वर्णन केलेल्या जमिनीचा भूखंडावरील व्यवसायिक इमारतीचा विकास नियमाप्रमाणे केला नसून सदर इमारतीमध्ये नियमबाह्य बांधकाम असल्याचा अहवाल नगरपरिषद प्रशासनाकडे पाठविला गेला आहे. सन १२८६/१ शिट नं. १२ मौजा ब्रह्मपुरी आराजी १३४०.६३ चौ. मीटर मध्ये व्यापार संकुल बांधकामात पाच त्रुट्या आढळून आल्या होत्या. त्यामध्ये मंजुरीपेक्षा जास्तीचे बांधकाम, उक्त अधिनियमान्वये आवश्यक असलेली परवानगी न घेता, मंजूर केलेल्या परवानगीप्रमाणे बांधकाम नाही, नियमाप्रमाणे मुदत वाढ मंजुरी नाही, मंजूर करण्यात आलेली परवानगीनुसार पार्र्कींगची सोय नाही आदी त्रुटी दाखवून नोटीस बजाविण्यात आली आहे.
या नोटीसमध्ये व्यापारी संकुलनाचे बांधकाम त्वरीत थांबवून सदरहू नोटीस मिळाल्याच्या एक महिन्याच्या कालावधीत अनाधिकृत बांधकाम काढण्याचे आदेश देण्यात आले आहे. याबाबत पूर्तत: करण्यास कारवाईत कसूर केल्यास फौजदारी दावा दाखल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
या साऱ्या प्रकरणावर विद्यमान उपाध्यक्ष अशोक भैय्या यांनी नगरपालिकेची विशेष सभा बोलावून विषय चर्चेस घडवून आणला व त्यावर उचीत कार्यवाही करण्याचे पालिका प्रशासनाला निर्देश दिले. त्यामुळे हे प्रकरण न्यायाच्या दिशेने गेले पाहिजे अशी नागरिकांची अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)