आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

By Admin | Updated: May 31, 2017 01:43 IST2017-05-31T01:43:32+5:302017-05-31T01:43:32+5:30

राज्यात मान्सून लवकर धडकणार असे वर्तमान आल्यानंतर जिल्हा प्रशासन वेगाने कामाला लागले

Administration ready for disaster management | आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रशासन सज्ज

अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश : अधिकाऱ्यांची आढावा बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : राज्यात मान्सून लवकर धडकणार असे वर्तमान आल्यानंतर जिल्हा प्रशासन वेगाने कामाला लागले असून मंगळवारला जिल्हयातील सर्व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बचत साफल्य सभागृहात पार पडली. यामध्ये पावसाळयात उद्भवणाऱ्या अघटीत घटनांचे आपत्ती व्यवस्थापन करण्यासाठी विविध उपाय सूचवण्यात आले. तसेच यंत्र सामुग्री तपासून तयार ठेवण्याचे व याकाळात मुख्यालय न सोडण्यांचे निर्देश देण्यात आले.
महानगर पालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकाऱ्यासह सर्व तहसीलदार व जिल्हा स्तरावरील वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी वैभव नावडकर यांनी यावेळी मार्गदर्शन केले. आपत्ती व्यवस्थापन अधिकारी निलेश तेलतुमडे यावेळी हजर होते.
जिल्हायातून वाहणाऱ्या वैनगंगा, वर्धा, इरई, पैनगंगा, उमा, गोधनी, अंधारी, झरपट, शिर आदी नदी शेजारील संभाव्य पूरग्रस्त गावांची नोंद ठेवण्यात आली आहे. चंद्रपूर पाटबंधारे विभागाने ८६ गावे पूरप्रवण म्हणून निश्चित केले आहे. या गावांमध्ये एनेवेळी गरज पडल्यास बोटींची व्यवस्था केली जाणार आहे.त्या सुस्थितीत व इंधनभरून ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. तसेच प्रत्येक तालुक्यात आपत्ती व्यवस्थापन कक्ष उघडण्याचे निर्देश देण्यात आले आहे. १ जूनपासूनच त्याची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नावडकर यांनी यावेळी दिले आहे.
यावेळी, नगरपरिषद, पाटबंधारे विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी, महाऔष्णिक विद्यूत केंद्र, सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा आरोग्य आधिकारी, दूरसंचार, वीज पूरवठा, जीवन प्राधिकरण, वनविभाग आदी प्रमुख विभागाच्या जबाबदाऱ्या स्पष्ट करण्यात आल्या. यावेळी नावडकर यांनी काही महत्वाच्या सूचना केल्या. यामध्ये जिल्ह्यातील प्रमुख कार्यालयात तातडीने नियंत्रण कक्ष उघडण्यात यावे. नियंत्रण कक्षाकडे अद्यावत संपर्क यंत्रणा असावी, सकाळी ८ वाजता तहसीलदारांनी नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा. १५ जुनपर्यंत तालुका स्तरावरील आपत्ती निवारण चमू गठीत करावी, शेती, घरे, गुरांचे नुकसान, पुरग्रस्त गावे, यासंदर्भात होणाऱ्या नुकसानाबद्दल प्रत्येक कर्मचाऱ्यांची भूमिका आणि त्यांची कर्तव्याबाबतचे सुस्पष्ट निर्देश देणारे कार्यालयीन आदेश देण्याचे निर्गमित करण्यात यावे.
नगरपालिका मुख्याधिकारी नगरपालिका यांनी नियंत्रण कक्षाची स्वत:जबाबदारी घ्यावी, नगरपालिका हद्दीतील धोकादायक इमारतीची माहिती घेऊन लगेच त्यांना नोटीस बजावण्यात याव्यात, नाल्या तुंबल्या असतील तर लगेच साफ करण्यात याव्यात, गाव, शहर पातळीवर याबाबतीत नाल्या सफाईचे काम झाले नसेल तर तातडीने याबाबत कारवाई व्हावी, जिल्हा क्रीडा अधिकारी आकास्मिक मदत पथकाचे नियंत्रण करणार आहेत.या पथकाने आकास्मिक परिस्थितीत उद्भवणारे संकट निवारण्यासाठी आवश्यक साधनसामुग्री तपासून घ्यावी, आवश्यक औषधाचा साठा ठेवावा, अशा सुचना करण्यात आल्या.

मदत माहितीसाठी दुरध्वनी क्रमांक
आपत्ती व्यस्थापनासाठी सर्वसामान्य जनतेने संपर्कासाठी प्रशासनाचे कान व डोळे होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पूर व अन्य आकस्मिक घटनेची माहिती देण्यासाठी नागरिकांनी टोल फ्री क्रमांक- १०७७ किंवा नियंत्रण कक्ष क्रमांक -०७१७२-२५१५९७ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

 

Web Title: Administration ready for disaster management

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.