ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:25 IST2021-04-19T04:25:38+5:302021-04-19T04:25:38+5:30
चंद्रपूर : काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत काटेकोर ...

ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासनाची पूर्ण तयारी
चंद्रपूर : काही दिवसांत कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येबरोबरच ऑक्सिजनच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. जिल्हा प्रशासनाकडून ऑक्सिजन पुरवठ्याबाबत काटेकोर नियोजन केले जात आहे. कोविड रुग्णालये आणि हेल्थ सेंटरमधील ऑक्सिजन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी तसेच कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी दोन वितरक नेमण्यात आले आहेत. या वितरकांकडून ऑक्सिजन पुरवठा पूर्ण क्षमतेने उपलब्ध करण्याबरोबरच इतर ठिकाणांहूनसुद्धा ऑक्सिजन उपलब्ध करण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिली.
नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही लक्षणे आढळल्यास तत्काळ चाचणी करून घ्यावी. तसेच लवकर उपचार घ्यावेत. घराबाहेर न पडता घरातच राहून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
बाॅक्स
२९ ऑक्सिजन सुविधायुक्त रुग्णालये
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत आहे. गंभीर रुग्णांना ऑक्सिजन, आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेडची अधिक गरज असते. रुग्णांना योग्य त्या आरोग्य सुविधा आणि सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासनामार्फत पाच शासकीय तर उर्वरित खासगी रुग्णालये अशी एकूण २९ ऑक्सिजन सुविधायुक्त रुग्णालये रुग्णांच्या सेवेसाठी कार्यान्वित केली आहेत. जिल्ह्यात डेडिकेटेड कोविड रुग्णालय व डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर यात ९३ आयसीयू व्हेंटिलेटर बेड, २२४ आयसीयू ऑक्सिजन बेड, तर ७५० ऑक्सिजन बेड असे एकूण १ हजार ६७ बेड उपलब्ध आहेत.
बाॅक्स
कंत्राटी डॉक्टरांच्या सेवा घेण्याचे निर्देश
चंद्रपूर : कोरोनाबाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत असून त्यांना शासकीय रुग्णालयात तत्परतेने आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जेथे डॉक्टरांची संख्या कमी पडत असेल तेथे कंत्राटी तत्त्वावर डॉक्टर व इतर आरोग्य सेवकांच्या सेवा वाढविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आरोग्य विभागाला दिल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांचा आढावा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी घेतला. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले, अपर जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, उपविभागीय अधिकारी रोहन घुगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड, उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) जनार्दन लोंढे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर सोनारकर, डॉ. श्रीकांत परांजपे, डॉ. श्रीकांत मसराम, डॉ. दीप्ती श्रीरामे यांच्यासह आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.