बंधारा बांधकामात प्रशासनाची दिरंगाई
By Admin | Updated: August 3, 2014 23:18 IST2014-08-03T23:18:47+5:302014-08-03T23:18:47+5:30
येथून जवळच असलेल्या गोवरी येथील बंधारा बांधकामाला दोन आमदारांच्या कारर्कीदीचा कालावधी लोटत चाललातरी या बंधाऱ्याचे बांधकाम अद्यापही पूर्ण झाले नाही. यासाठी प्रशासनाची दिरंगाई

बंधारा बांधकामात प्रशासनाची दिरंगाई
हरदोना : येथून जवळच असलेल्या गोवरी येथील बंधारा बांधकामाला दोन आमदारांच्या कारर्कीदीचा कालावधी लोटत चाललातरी या बंधाऱ्याचे बांधकाम अद्यापही पूर्ण झाले नाही. यासाठी प्रशासनाची दिरंगाई कारणीभूत असून या बंधाऱ्यातून लाखो लिटर पाणी वाहून जात आहे. तर दुसरीकडे शेतकरी सिंचनापासून वंचित आहे.
राजुरा तालुक्यातील गोवरी- गावालगत असलेला नाल्यावर सिंचनासाठी बंधारा बांधकाम सुरू करण्यात आले. परिसरात बंधाऱ्याची निर्मिती होणार असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या. तत्कालीन आमदार अॅड. वामनराव चटप यांच्या कार्यकाळात बंधारा मंजूर होऊन बांधकाम सुरुसुद्धा झाले. मात्र बंधारा बांधकामाला विलंब झाले. दरम्यान बंधारा बांधकाम परवडत नसल्याचे कारण पुढे करीत कंत्राटदाराने काम सोडून दिल्याची माहिती मिळाली आहे. त्यानंतर या बंधाऱ्याचा निधी वाढवून बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करावे यासाठी गोवरी येथील बंधारा समितीचे अध्यक्ष नागोबा लांडे, भास्कर लोहे, नामदेव जुनघरी, मारोती लोहे, रणदिवे, भाऊजी लोहे, भाऊराव रणदिवे, यांच्यासह गावकऱ्यांनी अनेकवेळा प्रशासनाला निवेदन दिले. विद्यमान आमदार सुभाष धोटे यांच्याकडे बंधारा बांधकामाबाबत निवेदन देऊन बंधाऱ्याचे बांधकाम पूर्ण करावे, अशी विनंती गावकऱ्यांनी केली. उन्हाळ्यापूर्वी बंधारा बांधकाम पूर्ण करणे आवश्यक असतानाही प्रशासनाने ठोस पाऊल उचलले नाही. परिणामी शेतकऱ्यांना मागील अनेक वर्षांपासून सिंचनापासून वंचित रहावे लागत आहे. बंधारा बांधकामाकडे प्रशासन तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे (वार्ताहर)