तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन लागले कामाला; आपण, सावधान केव्हा होणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 05:00 IST2021-08-07T05:00:00+5:302021-08-07T05:00:47+5:30
कोरोना लाट ओसरताच शासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करताना नागरिकांना त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, काहीजण याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. आता पुन्हा निर्बंधात शिथिलता आणली. रात्री ८ वाजतापर्यंत नियमावलीनुसार आस्थापनांना सूट दिली आहे. आतातर अनेकजण चेहऱ्यावर मास्क लावताना दिसत नाहीत. गर्दीत बिनदिक्कत वावरताना दिसत आहेत.

तिसऱ्या लाटेसाठी प्रशासन लागले कामाला; आपण, सावधान केव्हा होणार?
राजेश भोजेकर
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर : कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसरी लाट तीव्र होती. ही लाट थोपविताना अनेकांचा बळीही गेला. आता तिसरी लाटही उंबरठ्यावर आहे. दुसरीकडे शासनाकडून निर्बंध शिथिल होत असे असले तरी जिल्हा प्रशासनाची ही लाट थोपविण्यासाठी युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. परंतु नागरिकांकडून अपेक्षित काळजी घेतली जात नसल्याचे चित्र आहे.
कोरोना लाट ओसरताच शासनाने सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत निर्बंध शिथिल करताना नागरिकांना त्रिसूत्री पाळण्याचे आवाहन केले होते. मात्र, काहीजण याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत आहेत. आता पुन्हा निर्बंधात शिथिलता आणली. रात्री ८ वाजतापर्यंत नियमावलीनुसार आस्थापनांना सूट दिली आहे. आतातर अनेकजण चेहऱ्यावर मास्क लावताना दिसत नाहीत. गर्दीत बिनदिक्कत वावरताना दिसत आहेत.
हीच बाब तिसऱ्या लाटेसाठी कारणीभूत ठरण्याची भीती व्यक्त होत आहे. ही भीती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा तिसरी लाट थोपविण्यासाठी धडपडत आहे. या लाटेत सर्वाधिक कोरोना संक्रमण लहान मुलांना होईल, असे भाकीत वर्तविले जात आहे.
निर्बंध शिथिल असले तरी नागरिकांनी आतापासूनच स्वत:सह आपल्या मुलांची काळजी घेतली नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.
ऑक्सिजन प्लांटच्या कामाला गती
जिल्ह्यात दुसऱ्या लाटेतील विदारक स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आरोग्य विभागाच्या माध्यमातून तिसऱ्या लाटेत या अडचणी येऊ नये म्हणून तीन ऑक्सिजन प्लांटचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. सामान्य रुग्णालय परिसरात एक व महिला रुग्णालय परिसरात एक अशा दोन प्लांटचे काम सुरू आहे. या प्लांटमध्ये हवेतून गॅसेस ऑक्सिजनचा पुरवठा रुग्णांना पाईपलाईनच्या माध्यमातून थेट होईल. हा प्लांट रुग्णांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे.
तिसरा प्लांट एअर सेप्रेशन युनिट
तिसरा प्लांट म्हणजेच एअर सेप्रेशन युनिटची निर्मिती केली जात आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नवीन बांधकाम सुरू असलेल्या परिसरात हा प्लांट उभारला जात आहे. एका दिवशी ५०० ऑक्सिजन सिलिंडर भरून देण्याची क्षमता या प्लांटची आहे. या सिलिंडरचा पुरवठा जिल्हाभरात केला जाणार आहे. यामुळे मोठ्या खर्चाची बचत होणार आहे. या युनिटला क्रायजेनिक ऑक्सिजन जनरेट प्लांट असेही म्हणतात. हवेतून लिक्विड तयार होते. लिक्विडचे रुपांतर गॅसेसमध्ये होईल. मग सिलिंडरमध्ये भरून रुग्णालयांना त्याचा पुरवठा केला जाईल, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. निवृत्ती राठोड यांनी ‘लोकमत’ला दिली.
१०० बेडचे रुग्णालय मुलांसाठी तयार होतेय
मोठ्या व्यक्तींनी काळजी घेतली नाही तर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संसर्ग लहान मुलांना मोठ्या प्रमाणावर होईल, अशी भीती व्यक्त होत आहे. काही नागरिक स्वत:ची काळजी घेताना दिसत नसल्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होऊन इतरांना संसर्ग होईल. यामध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित होतील. ही भीती लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महिला रुग्णालयात मुलांसाठी १०० बेडच्या ऑक्सिजनची सुविधा असलेल्या रुग्णालयाचे काम सुरू आहे. यामध्ये २५ व्हेंटिलेटर बेड असतील, अशी माहितीही डाॅ. निवृत्ती राठोड यांनी दिली.